जेएनएन, मुंबई. Anandacha Shidha Scheme : राज्य सरकारची लोकप्रिय योजना असलेली आनंदाचा शिधा योजना (Anandacha Shidha Scheme) यंदा बंद करण्यात आली आहे. यंदाच्या सणासुदीला राज्यातील जनतेला आनंदाचा शिधा मिळणार नाही. राज्य सरकारच्या आर्थिक ताणतणावाचा फटका आता गरीब आणि गरजू नागरिकांच्या योजनांना बसू लागला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदा ‘आनंदाचा शिधा’ योजना रद्द करण्यात आली असून, शिवभोजन थाळी योजनेंतर्गतही बजेटमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आर्थिक चणचणीमुळे सरकारने हे कठोर पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
‘आनंदाचा शिधा’ योजना बंद?
दरवर्षी सणासुदीच्या काळात रेशन धारकांना मोफत किंवा अत्यल्प दरात जीवनावश्यक वस्तूंचा ‘आनंदाचा शिधा’ पुरवण्यात येत होता. मात्र यंदा ही योजना रद्द करण्यात आली असून, त्यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही. सणांच्या पार्श्वभूमीवर गरीब जनतेसाठी ही योजना मोठा दिलासा ठरत होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या माध्यमातून सणाच्या दिवशी राज्यातील 1 कोटी 63 लाख लोकांना याचा लाभ मिळत होता. राज्यातील तिजोरीमध्ये असलेल्या खडखडाटामुळे अखेर ही योजना बंद करण्याची नामुष्की राज्य सरकारवर आल्याची चर्चा आहे.
शिवभोजन थाळीवरही परिणाम-
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक ‘शिवभोजन थाळी’ योजना देखील आर्थिक अडचणींच्या कचाट्यात सापडली आहे. याअंतर्गत गरजू नागरिकांना अल्पदरात जेवण उपलब्ध करून दिले जाते. मागील वर्षी या योजनेसाठी सुमारे 60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदा ती केवळ 20 कोटी रुपयांवर आली आहे, म्हणजेच थेट 40 कोटी रुपयांची कपात या योजनेत करण्यात आली आहे.
सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही-
दरम्यान,या संदर्भात सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. तरी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी योजनांवरील कपातीची शक्यता मान्य केली आहे. आगामी काही दिवसांत याबाबतची माहिती समोर येणार आहे.