जेएनएन, मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पालघर साधू हत्याकांड चर्चेत आले आहे. या प्रकरणातील ज्याच्यावर आरोप झाले होते, त्या काशिनाथ चौधरी यांचा अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. यामुळे भाजपवर जोरदार टीका झाली असून, विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता “ज्यावर साधूंच्या हत्येचा आरोप केला होता, त्यालाच भाजपात का घेतलं?” या वादावर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
फडणवीसांचे स्पष्टीकरण 'चौधरी निर्दोष'
फडणवीस म्हणाले की, काशिनाथ चौधरी यांच्यावर पालघर प्रकरणात कोणतंही गुन्हेगारी पुरावे सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे ते कायद्याने निर्दोष ठरले. त्यांच्या नावावर लावलेले आरोप “पूर्णपणे राजकीय” असल्याचा दावा त्यांनी केला. चौधरींना न्यायालयाने क्लीनचिट दिली आहे. त्यामुळे पक्षात प्रवेश देण्यात कोणताही कायदेशीर किंवा नैतिक अडथळा नव्हता. विरोधक “अर्धवट माहिती” पसरवत असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले
रविंद्र चव्हाण यांनी दिली तात्काळ स्थगिती
दरम्यान, पालघर जिल्ह्यातील काशीनाथ चौधरी यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तात्काळ स्थगिती दिली असल्याची माहिती भाजपाचे पदाधिकारी नवनाथ बन यांनी सोमवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बन बोलत होते.
चौधरी यांचा सीबीआय अथवा सीआयडी यांनी केलेल्या तपासात कोठेही आरोपी म्हणून उल्लेख नाही. तपासातील अधिकृत नोंदींनुसार कोणत्याही प्राथमिक माहिती अहवालात किंवा आरोपपत्रामध्ये चौधरी यांचे नाव नाही. या सर्व माहितीची खातरजमा करून स्थानिक पातळीवर चौधरी यांना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. पालघर साधू हत्याकांडातील दोषींना कठोर शासन व्हावे यासाठी भारतीय जनता पार्टीने आग्रही भूमिका घेतली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने या हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. पुरेशी चौकशी करून स्थानिक पातळीवर चौधरी यांच्या प्रवेशाचा निर्णय झाला. मात्र या प्रवेशानंतर समाज माध्यमांमध्ये तसेच प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाल्याने या विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन चौधरी यांच्या प्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बन यांनी स्पष्ट केले.
