जेएनएन, मुंबई. पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचे नाव आल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे वरिष्ठ नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी देखील वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली.
कोरेगाव पार्कमधील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारात अजित पवार आणि पार्थ पवार यांचे नाव चर्चेत आल्यानंतर, विरोधकांनी थेट कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणात चौकशी सुरू असून, पुणे नोंदणी विभागाकडून एक अंतरिम अहवाल मुंबईतील अतिरिक्त मुख्य सचिवांना सादर करण्यात आला आहे. त्यानंतर सरकारकडून या अहवालावर पुढील कारवाईची शक्यता वर्तवली जात आहे.
फडणवीस आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर पवार गटाचे अन्य नेतेही वर्षा बंगल्यावर दाखल होत असून पार्थ पवारला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका महाविकास आघाडीकडून केली जात आहे. कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यावर अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जात आहे.
सत्ताधारी महायुतीत गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे महत्त्व अधिक वाढले आहे. अजित पवार गटाने आपल्यावर चालू असलेल्या आरोपांबाबत सरकारपातळीवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.
वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीनंतर पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असून, कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
