जेएनएन, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर आता महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकींबाबत सविस्तर माहिती देत, अजित पवारांनी मनापासून एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता असं स्पष्ट केलं आहे.
जयंत पाटील यांनी सांगितलं की, अलीकडच्या काळात अजित पवार स्वतः चार वेळा त्यांच्या घरी जेवणासाठी आले होते. या भेटी केवळ औपचारिक नाही,तर त्या वेळी पक्षाच्या भवितव्याबाबत आणि एकत्र येण्याच्या शक्यतेवर सखोल चर्चा झाली होती.
“जवळपास आठ ते दहा बैठका आमच्या घरीच झाल्या. त्या प्रत्येक बैठकीत दादांचा एकत्र येण्याचा आग्रह स्पष्ट दिसत होता,” असं जयंत पाटील म्हणाले.
विशेष म्हणजे 16 तारखेला जयंत पाटील यांच्या घरी झालेल्या बैठकीत सर्व प्रमुख नेते एकत्र उपस्थित होते. त्या बैठकीतच एकत्र येण्याच्या घोषणेबाबत ठोस चर्चा झाली होती. अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की, ‘जयंत पाटील ज्या दिवशी सांगतील, त्या दिवशी आपण एकत्र येण्याची घोषणा करू.’
यानंतर सर्वांच्या सहमतीने 12 फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली होती. त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याची अधिकृत घोषणा करण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
महत्त्वाचं म्हणजे, अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी म्हणजेच 28 जानेवारी रोजी जयंत पाटील यांनी ही माहिती उघड केली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की, अजितदादांनी शरद पवारांकडे पाहून, त्यांच्याशी संवाद साधूनच एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय केवळ राजकीय गणिताचा नव्हता, तर पक्ष एकसंघ राहावा, हीच त्यामागची भूमिका होती.
