जेएनएन, अहिल्यानगर. Ahmednagar Railway Station Name Change : गेल्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर यश आले असून अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ नामांतर झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकाच्या नावातही बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेकडून आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव अधिकृतपणे ‘अहिल्यानगर रेल्वे स्टेशन’ करण्यात आले आहे.
राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर महाराष्ट्र शासनानं राजपत्र प्रकाशित करून याला अधिकृत मान्यता दिली आहे. रेल्वे मंत्रालयानेही हा प्रस्ताव मंजूर केला असून आता तिकीट बुकिंग सिस्टम, स्थानक फलकं, सूचना पाट्या व सार्वजनिक घोषणांमध्ये ‘अहिल्यानगर’ हे नाव वापरलं जाणार आहे.
स्थानकातील बदल!
स्टेशनवरील फलके, दिशादर्शक बोर्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले यामध्ये ‘अहिल्यानगर’ हे नाव झळकणार आहे.
रेल्वेच्या IRCTC तिकीट प्रणालीत देखील हे नाव अपडेट होणार.
स्थानिक प्रशासनाकडून शहरातील परिवहन, बसस्थानकं, रस्ते दिग्दर्शक पाट्या यामध्येही बदल करण्यात आले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून अहमदनगर जिल्ह्याचे व शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी अनेक संघटना आणि नागरिकांकडून केली जात होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारने जिल्ह्याचे नामांतर करून याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. जिल्ह्याचं नाव बदलल्यानतर आता रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे स्थानकाचे नाव बदलत असल्याचे स्पष्ट केले आहे.