डिजिटल डेस्क, नवी दिल्ली. Ahmedabad Flight Crash: अहमदाबादमधील हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण देश शोकाकुल आहे. विमानातील 241 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये विमानातील पायलट आणि सह-पायलटचा समावेश आहे. गुरुवारी दुपारी अहमदाबाद विमान अपघातात कॅप्टन सुमित सभरवाल (pilot Sumit Sabharwal) आणि फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर यांचा मृत्यू झाला.
या दोन्ही पायलटना एकूण 9300 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता आणि ते दोघेही एअर इंडिया बोईंग 787-8 ड्रीमलायनर उडवत होते. उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळले. या घटनेत सुदैवाने विश्वास कुमार रमेश हा एकमेव प्रवासी वाचला.
अनुभवी वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांना 8300 तासांचा विमान उड्डाणाचा अनुभव होता. पवई येथील रहिवासी सभरवाल यांनी त्यांच्या वडिलांना नोकरी सोडून त्यांची काळजी घेण्यासाठी पूर्ण वेळ देण्याचे वचन दिले होते.
कॅप्टन सभरवाल अविवाहित होते आणि ते त्यांच्या 90 वर्षांच्या वडिलांसोबत राहत होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सभरवाल यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी गेलेले शिवसेना आमदार दिलीप पांडे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच कॅप्टन सुमित यांनी त्यांच्या वडिलांना सांगितले होते की, ते नोकरी सोडून त्यांची काळजी घेतील.
कॅप्टन सुमितच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, सभरवाल कुटुंबाचा विमान वाहतूक उद्योगाशी खोलवर संबंध आहे. कॅप्टन सभरवालचे वडील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयातून (DGCA) निवृत्त झाले आहेत. तर त्यांचे दोन पुतणे देखील वैमानिक आहेत.
एका शेजाऱ्याने सांगितले की, कॅप्टन सभरवाल जेव्हा जेव्हा बाहेर जायचे तेव्हा ते त्यांच्या वडिलांची काळजी घेण्यास सांगत असत. पण आता त्यांचे वडील पूर्णपणे तुटले आहेत.
क्लाईव्ह कुंदर यांना 1100 तासांचा अनुभव
कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यासोबत सह-वैमानिक आणि प्रथम अधिकारी क्लाईव्ह कुंदर यांचाही अपघातात मृत्यू झाला. क्लाईव्ह कुंदर यांना 1100 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता. त्यांची आई एअर इंडियाची माजी फ्लाइट अटेंडंट होती.