जेएनएन, मुंबई - नागपूर विधीमंडळ अधिवेशनाच्या काळातच उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी आमदाराचा नोटांच्या बंडलांसह व्हिडिओ पोस्ट केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडली आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता मनसेही कॅश बॉम्ब टाकून वातावरण आणखी तापवलं आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला आहे.
देशपांडे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ हाफकिन येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे. या व्हिडिओमध्ये शाखा अभियंता कंत्राटदाराकडून नोटांची बंडले घेताना दिसत आहे.
देशपांडे यांनी म्हटले की, एक व्हिडिओ आज पोस्ट केलाय, उद्या दुसरा करू, परवा तिसरा करणार.. जोपर्यंत शासन या प्रकाराची दखल घेत नाही आणि आरोपांना उत्तर देत नाही तोवर आम्ही ही प्रकरणे बाहेर काढत राहू, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला. त्यांनी म्हटले की, पीडब्ल्यूडी विभागातील अभियंता लेटर ऑफ क्रेडिटच्या नावाखाली पैसे घेत आहे. सरकारकडून जो निधी आणला जातो, त्या निधीची टक्केवारी आधीच कंत्राटदारांकडून गोळा केली जाते. हे फक्त एका कंत्राटदारांकडून घेतल्याचे समोर आले आहे परंतु अशा अनेक कंत्राटदारांकडून हे पैसे घेतले जातात. असे उपअभियंत्यापासून सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत.
सरकारच्या निधीतून सर्वांची बिले भागली जात नाहीत त्यात कंत्राटदारांची बोली लागते. त्यातच अनेक कंत्राटदारांनी कामे न करता फक्त बिलाचे पैसे उचलतात. ज्या कंत्राटदारांनी काही काम केले नाही अशांची बोली जास्त लागते कारण त्यांनी काम केलेले नसते. अशा कंत्राटदारांची यादी आहे.
या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.. बाकी सगळं ओक्के आहे!
— Ambadas Danve (@iambadasdanve) December 9, 2025
जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?@mieknathshinde @Dev_Fadnavis @AmitShah @BJP4Maharashtra #Moneypower #ruins #Maharashtra pic.twitter.com/WUDpmedTgo
आमदाराचा नोटांची बंडले मोजतानाचा व्हिडीओ -
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर सत्ताधारी आमदाराचा नोटांची जाडजूड बंडले मोजतानाचा व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
या व्हिडिओतील आमदार नेमका कोण? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. या व्हिडीओमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी दिसून येत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
