जेएनएन, मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून जनतेत जागरूकता निर्माण करण्यासाठी मोठी मोहीम केली आहे.या मोहिमेचा भाग म्हणून सोमवारी ‘निर्धार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वतः हजेरी लावून मुंबईतील मतदार यादीतील कथित घोटाळ्यांवर भाष्य करणार आहेत.

आदित्य ठाकरे फोडणार “बोगस वोटिंग”चा बॉम्ब?

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस नावे समाविष्ट झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा संपूर्ण डेटा, पुरावे आणि आकडेवारीसह तपशील सोमवारी मेळाव्यात मांडणार आहेत. “मुंबईच्या लोकशाहीत बोगस मतदारांचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही,” असा संदेश  उबाटाने दिला आहे.

निवडणुकीपूर्वी ठाकरे सेनेचा ‘निर्धार’
महापालिका निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्याआधीच ठाकरे गटाने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी आणि ‘स्वच्छ, पारदर्शक निवडणूक’ यासाठी हा निर्धार मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यात मतदार यादीतील बोगस नावे ओळखणे, तक्रार नोंदवणे आणि मतदान केंद्रांवर दक्षता ठेवणे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

मुंबईतील अनेक मतदारसंघांमध्ये एकाच व्यक्तीची नावे दोन ते तीन मतदार याद्यांमध्ये दिसून येत आहेत, काही ठिकाणी मृत व्यक्तींची नावे अजूनही यादीत आहेत, तर काही ठिकाणी बाहेरील मतदार दाखवले गेले आहेत. या सर्व गोष्टींचा तपशील ठाकरेंच्या टीमकडून गोळा करण्यात आला आहे.या सर्व बाबी मेळाव्यात उघड केला जाणार आहे.

हेही वाचा: Dhangekar Vs Mohol: रवींद्र धंगेकरांचा नवा आरोप; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात