जेएनएन, मुंबई: महाविकास आघाडीतील तणाव पुन्हा एकदा उफाळून येत आहे.काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा दिल्यानंतर आता समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनीही "सपा मुंबई पालिका निवडणुकीत स्वबळावर उतरेल" असा ठाम नारा दिला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस दिसू लागली आहे.
अबू आझमींची घोषणा!
अबू आझमी यांनी पत्रकार परिषद घेत "समाजवादी पक्षाने नेहमीच जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला आहे. मविआमध्ये आम्हाला योग्य सन्मान मिळाला नाही. त्यामुळे यावेळी मुंबई महानगरपालिकेसह इतर काही ठिकाणी आम्ही स्वबळावर उमेदवार देणार आहोत," असे जाहीर केले आहे.“महाविकास आघाडीतील मोठे पक्ष आपले वर्चस्व गाजवू पाहत आहेत. मात्र आमच्याकडेही मुस्लिम समाजासह अनेक घटकांचा मजबूत पाठिंबा आहे. आमचा पक्ष कुणाच्या सावलीखाली लढणार नाही.”
काँग्रेसनंतर सपा — आघाडीतील असंतोष वाढला!
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते भाई जगताप यांनीही मुंबईत स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. काँग्रेसला वाटपात अन्याय होत असल्याचा आरोप केला होता. आता त्यानंतर अबू आझमींची भूमिका आल्याने, मविआतील एकोप्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मविआमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस हे तीन प्रमुख घटक आहेत. मात्र, मुंबईतील काही मतदारसंघात समाजवादी पक्षाचं लक्षणीय अस्तित्व असल्याने त्यांच्या सहभाग महत्त्वाचा आहे.
