जेएनएन, मुंबई. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यासह आपल्या महाराष्ट्रातील 5 समुद्रकिनाऱ्यांनी 'ब्लू फ्लॅग पायलट' हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला आहे. समुद्रकिनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व पर्यावरण स्नेही धोरणांतून भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेले हे यश प्रेरणादायी आहे, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. 

ब्ल्यू फ्लॅग पायलट म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा "ब्ल्यू फ्लॅग इंडिया" या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. 'ब्लू फ्लॅग पायलट' दर्जा हे किनाऱ्याला मिळालेले 'उत्तम गुणवत्ता प्रमाणपत्र' आहे. ज्या किनाऱ्यावर हा ध्वज फडकतो,तो किनारा जगातील सर्वोत्तम आणि सुरक्षित किनाऱ्यांपैकी एक मानला जातो,"ब्ल्यू फ्लॅग पायलट"दर्जा मिळाल्यामुळे श्रीवर्धनसह इतर चारही समुद्रकिनारे ब्ल्यू फ्लॅग मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

स्थानिक रोजगाराला चालना मिळेल

महाराष्ट्रातील पर्णका बीच (डहाणू, पालघर), श्रीवर्धन बीच (रायगड), नागाव बीच (रायगड), गुहागर बीच (रत्नागिरी) आणि लाडघर बीच (रत्नागिरी) या समुद्रकिनाऱ्यांना मिळालेले हे यश म्हणजे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या शासनाच्या कटिबद्धतेची आणि दूरदृष्टीच्या कामाची पावती आहे. भविष्यात आपल्या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल हा मला विश्वास आहे.