मुंबई. Mumbai Rain Update : राज्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, बस आणि विमान वाहतुकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे विस्कळीत झालेली मुंबईची लोकल रेल्वे सेवा ८ तासानंतर पुन्हा सुरू झाली आहे. लोकल रेल्वे 40 ते 45 मिनिटे उशिरा धावत आहे. विशेषतः हार्बरलाईन वरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.

CSMT ते कुर्ला दरम्यान पाणी ट्रॅकवर जमा झाल्याने रेल्वे 40 ते 45 मिनिटे उशिरा धावत आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने बस सेवा बंद असून अनेक बस रोडवरच उभ्या आहेत.

विमानसेवेवर परिणाम -

पावसामुळे विमानसेवांवर थेट परिणाम झाला आहे. गेल्या 24 तासांत 250 हून अधिक विमानांनी उशिराने उड्डाण केले आहे, तर अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत. माहितीनुसार155 निर्गमन (Flight departure) आणि 102 आगमन (arrival)  फ्लाइट्समध्ये उशीर झाला आहे. यामुळे विमानसेवा 45 मिनिट उशिरा सुरू आहे.

आज सकाळी  पावसामुळे  ७ फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. IndiGo, Akasa Air, आणि Air India यांनी प्रवाशांना विमानसेवेमध्ये होत असलेल्या विलंबाबद्दल अलर्ट जारी केला आहे .

    मुंबईतील लोकल सेवा -

    मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज  सकाळपासून रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तब्बल 8 तासानंतर लोकल सेवा सुरू झाली आहे. तर रेल्वे 40 ते 45 मिनिटे उशिरा धावत आहे.

    रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार CSMT ते ठाणे आणि CSMT-मानखुर्द (हार्बर लाईन) या महत्त्वाच्या मार्गांवर पाणी साचल्याने लोकल सेवा बंद करण्यात आली होती. कुर्ला, सायन आणि चुना-भट्टी परिसरात रेल्वे ट्रॅकवर 11 ते 19 इंच पाणी साचले होते. सुरक्षेच्या कारणामुळे गाड्या थांबवण्यात आल्या होत्या. काही तासांच्या प्रयत्नानंतर पाणी कमी होताच लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

    एक्सप्रेस गाड्या रद्द !

    मुंबईतून बाहेर गावी लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही पावसाचा परिणाम झाला आहे. आज एकूण 11 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांसह वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले  आहे.

    मोनोरेल सेवा पुन्हा सुरू -

    काल मोनोरेल मध्ये झालेल्या घटनेनंतर मोनोरेल सेवा आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मोनोरेलच्या चेंबूर ते भक्ती पार्क या मार्गावरील म्हैसूर कॉलनीजवळ मोनोरेल अचानक थांबल्याने आत अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपत्कालीन जलद  कार्यवाही करण्यात आली आहे.या कार्यवाहीमध्ये तब्बल 442 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे.