एजन्सी, मुंबई: रायगड जिल्ह्यात एका 17 वर्षीय मुलीवर दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांनी वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यातून ती गरोदर राहिल्याची घटना घडली आहे, असे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.
21 ते 40 वयोगटातील प्रौढ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर दोन्ही 17 वर्षीय अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख असलेल्या आरोपींनी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले आणि या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही आरोपींनी दिली.
याशिवाय, एप्रिल ते जून दरम्यान, आरोपींपैकी एक असलेला 40 वर्षांचा गवंडी, जो पीडितेच्या घराच्या बांधकामावर काम करत होता, त्याने पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांच्या अनुपस्थितीत तिच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुलगी 24 ते 26 आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला.
पीडितेच्या जबानीच्या आधारे म्हसळा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि बाल लैंगिक शोषणापासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी नमूद केले.
