जेएनएन, मुंबई. Weather Update Today: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी हे चिंताग्रस्त झाले होते. मात्र, आता IMD ने जाहीर केलेल्या नवीन अहवालानुसार शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.

ऑगस्टच्या शेवटी आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे सरकारसह शेतकरी आणि सामान्य जण चिंतेत पडला होता. मात्र, काल अनेक भागात पाऊस पडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यातच आजही हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट दिला आहे.

ग्रामीण भागात कोरडवाहू शेतीवरील पिकांना माना टाकल्या होत्या तर काही भागात पिके ही करपू लागली होती. मात्र, आता पावसाचा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा धीर मिळाला आहे. तर काही भागात पाऊस कोसळत असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

आज या भागात पावसाचा अलर्ट

रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 -40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. 

उद्या या भागात पावसाचा अलर्ट 

    रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे घाट, पुणे, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (30 -40 किमी प्रतितास) येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. 

    मुंबईत कसे राहिल हवामान

    मुंबईत आकाश अंशतः ढगाळ राहील आणि शहरात व उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. शहरात कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.