जेएनएन, मुंबई. Maharashtra Rain News : महाराष्ट्रात पावसाने पुन्हा जोर पकडण्याची शक्यता असून आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आजच्या ताज्या अंदाजात कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रासाठी जोरदार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांचा इशारा दिला आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणालीचा प्रभाव पुढील काही दिवस महाराष्ट्रावर दिसणार आहे. त्यामुळे 23 ते 26 सप्टेंबरदरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

आज कुठे पावसाचा इशारा? 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ॉ

राज्यातील नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे, पुणे घाट, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली आणि सोलापूर या भागांत पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथेही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

मुंबईला अलर्ट

    मुंबई आणि परिसरातही पावसाची शक्यता कायम आहे. शहर आणि उपनगरात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 

    कोकण विभागासाठी IMDच्या अंदाजानुसार आज आणि उद्या जोरदार पाऊस, तसेच मेघगर्जना-विजांचा इशारा देण्यात आला आहे. 24 सप्टेंबरला मेघगर्जनेचा इशारा कायम असून त्यानंतर पावसाचा जोर तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे.