जेएनएन, मुंबई. देशभरात यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाने मोठी तूट निर्माण झाली असतानाच आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 19 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मोसमी वारे माघारी फिरण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, 20 सप्टेंबरपर्यंत देशात मोसमी पावसाची एकूण तूट सुमारे 15 टक्के राहिली आहे. जून 1 ते सप्टेंबर 20 या कालावधीत देशात 699.7 मिमी पावसाची नोंद झाली असून, याच कालावधीतील सामान्य पाऊस 822 मिमी आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रात अद्याप पावसाची स्थिती कायम राहणार आहे. IMD च्या 21 सप्टेंबरच्या इशाऱ्यानुसार, कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात 21 ते 23 सप्टेंबरदरम्यान मुसळधार पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातही या काळात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भातही पावसाचा जोर वाढणार
विदर्भासाठी हवामान विभागाने तुलनेने अधिक काळासाठी पावसाचे संकेत दिले आहेत. 21 आणि 22 सप्टेंबरला मेघगर्जना-विजांसह पाऊस, 23 सप्टेंबरला मुसळधार पाऊस, तर त्यानंतरही काही भागांत पावसाची शक्यता कायम राहणार आहे. 24 आणि 25 सप्टेंबरला विदर्भातील काही भागांत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, 26 सप्टेंबरलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांतही पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. नॉर्थ महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात स्थानिक वातावरणानुसार विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात.
देशात 15 टक्के पावसाची तूट
यंदाच्या मान्सून हंगामात सुरुवातीपासूनच पावसाची स्थिती असमान राहिली. जूनमध्ये मोठी तूट नोंदवली गेल्यानंतर जुलैमध्ये पावसाने काही प्रमाणात भरपाई केली.मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील तुलनेने कमी पावसामुळे हंगामाच्या अखेरीस देशातील एकूण तूट पुन्हा वाढली. 20 सप्टेंबरपर्यंत देशात सामान्यपेक्षा सुमारे 15 टक्के कमी पाऊस झाला आहे.
या पावसाच्या तुटीचा परिणाम शेतीवर होण्याची चिंता आहे. खरीप पिकांच्या वाढीच्या आणि काढणीपूर्व टप्प्यात पावसाचे वितरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे काही भागांत झालेला मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे दीर्घकाळ पडलेला खंड यामुळे शेतकऱ्यांसमोर परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे.
