जेएनएन, मुंबई: राज्यातील काही भागांत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 3 ते 5 नोव्हेंबर या कालावधीत कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय गुजरात प्रदेशातही हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष हवामानातील बदलांकडे लागले आहे. विशेषतः काढणीला आलेली पिके, शेतीमाल आणि बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या शेतमालाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा अंदाज महत्त्वाचा ठरणार आहे.

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे वातावरणात बदल 

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ मुरासू आणि त्याच्याशी संबंधित हवामान प्रणालीमुळे देशाच्या विविध भागांतील वातावरणात बदल होत आहेत. या प्रणालीतून निर्माण होणारा बाष्पयुक्त वारा आणि अरबी समुद्राकडून येणाऱ्या आर्द्रतेमुळे महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी समुद्रातील द्रोणीय स्थितीचा प्रभावही कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. 

कोणत्या भागात पावसाची शक्यता? 

  • कोकण आणि गोवा - 3 नोव्हेंबरला काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
  • मध्य महाराष्ट्र - 3 ते 4 नोव्हेंबरदरम्यान काही भागांत पाऊस आणि मेघगर्जनेसह वादळी हवामान राहण्याचा अंदाज आहे. 
  • मराठवाडा - 3 नोव्हेंबरला काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

    अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके, धान्य आणि शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची गरज आहे. शेतात उघड्यावर ठेवलेला शेतमाल ताडपत्रीने झाकून ठेवावा. तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे आणि काढणीचे नियोजन करावे.