मुंबई. Maharashtra Rain Update: जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार ते अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले, तर नद्या-नाले दुथडी भरून वाहिले. मात्र, या काही भागांतील जोरदार पावसाचे चित्र संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व करत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून, 8 जुलैपासून पावसाच्या तीव्रतेत आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जुलैच्या सुरुवातीपासून मुंबईमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारनंतर थोडा कमी होईल, असा अंदाज आहे. मुंबईमध्ये सोमवारी वाऱ्याचा वेग अधिक असण्याची शक्यता असल्याने आधीचा ऑरेंज ॲलर्ट अद्ययावत करून सकाळी रेड ॲलर्ट देण्यात आला.

हवामानातील असमानतेमुळे राज्यात पावसाचे वितरण अत्यंत विस्कळीत झाले आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर काही दिवस अतिवृष्टी झाली असताना मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक तालुक्यांमध्ये अपेक्षित पावसाचा मोठा तुटवडा कायम आहे. काही ठिकाणी पेरणीनंतर उगवलेली पिके पाण्याअभावी करपू लागल्याचे चित्र आहे.

खरीप हंगामासाठी जुलैचा पहिला आणि दुसरा आठवडा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच काळात सोयाबीन, कापूस, तूर, मका, भात आणि इतर पिकांच्या वाढीसाठी सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता असते. मात्र, अनेक भागांत पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांच्यासमोर पिके वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. तर काही भागांत अद्याप पावसाअभावी पेरणीही रखडली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतो. मात्र व्यापक आणि समाधानकारक पावसाची शक्यता कमी असल्याचे संकेत हवामान विभागकडून मिळत आहे. त्यामुळे पावसातील ही खंडित परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते.

    जलसाठ्यावरही होणार परिणाम -

    दरम्यान, जलसाठ्यांवरही या परिस्थितीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नसल्याने पुढील काळात पाऊस कमी राहिल्यास पिण्याचे पाणी आणि सिंचन व्यवस्थेवरही दबाव वाढू शकतो.

    कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना उपलब्ध ओलावा जपण्याचे उपाय, शेतातील पाणी साचू न देणे, तसेच स्थानिक कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक कृषी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. पुढील काही दिवसांत पावसाची परिस्थिती कशी राहते, यावर खरीप हंगामाचे यश मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.