मुंबई. Vinod tawde and jayant patil meets: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) एनडीएला पाठिंबा देण्याच्या शक्यतेची पक्षांतर्गत चाचपणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी पक्षातील एका ज्येष्ठ आणि शरद पवारांचे विश्वासू नेत्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

माहितीनुसार, या नेत्याकडे एनडीएमधील सर्वात मोठा घटक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधण्याची आणि संभाव्य राजकीय तडजोडीची शक्यता तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या चर्चेत कोणत्या अटींवर सहकार्य होऊ शकते, याचीही चाचपणी केली जात असल्याचे समजते.

जयंत पाटील-विनोद तावडे यांच्यात गुप्त बैठक-

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे वरिष्ठ नेते विनोद तावडे यांच्यात मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महायुतीत सहभागी झाल्यास पक्षाच्या वाट्याला काय येऊ शकतं? याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. विनोद तावडे आणि जयंत पाटील यांच्यातील बैठकीनंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यासोबतही चर्चा केल्याची माहिती आहे.

पक्षांतर्गत दोन पर्यायांवर चर्चा

सध्या शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 आमदार आणि 8 खासदारांचे संख्याबळ आहे. या पार्श्वभूमीवर एनडीएला थेट सरकारमध्ये सहभागी होऊन पाठिंबा द्यायचा की बाहेरून पाठिंबा देण्याचा पर्यायवर विचार केले जात आहे.

    या संदर्भात पक्षाच्या आमदार आणि खासदारांची मते जाणून घेण्यासाठीही एका वरिष्ठ नेत्याकडे जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. लोकप्रतिनिधींची भूमिका, राजकीय परिणाम आणि कार्यकर्त्यांच्या भावना यांचाही आढावा घेतला जात असल्याची चर्चा आहे.

    भाजपशी संवादाची जबाबदारी

    माहितीनुसार, शरद पवारांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या एका वरिष्ठ नेत्यामार्फत भाजपच्या नेतृत्वाशी अनौपचारिक संवाद सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही बाजूंमध्ये सहकार्याची शक्यता, त्यासाठी आवश्यक असलेल्या राजकीय अटी आणि भविष्यातील समीकरणांवर प्राथमिक स्तरावर चर्चा होऊ शकते, असेही बोलले जात आहे.

    दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार?

    शरद पवार गटाने एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यास राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील दुरावा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आधीच महायुती सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे शरद पवार गटानेही एनडीएला पाठिंबा दिल्यास दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.