मुंबई. Sharad Pawar News. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. ‘ऑपरेशन टायगर’नंतर आता ‘ऑपरेशन तुतारी’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट आणि त्याआधी भाजप नेते विनोद तावडे व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात झालेल्या भेटीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
या सर्व घडामोडी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात NDA मध्ये जाण्याच्या चर्चांमुळे नाराजी वाढल्याचे दिसून आले आहे. पक्षाचे आमदार रोहित पवार हे अशा कोणत्याही राजकीय निर्णयाच्या विरोधात असल्याची चर्चा आहे.
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीने चर्चांना उधाण-
बुधवारी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवन येथे भेट घेतली. शरद पवार भेटीसाठी आल्याचे समजताच, एकनाथ शिंदे यांनी सुरू असलेली बैठक काही काळासाठी सोडून त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी राजकीय चर्चांना वेग आला आहे.
तावडे–जयंत पाटील भेटीचीही चर्चा-
काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट)चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातही भेट झाल्याचे समोर आले होते. या सलग भेटींमुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि सत्ताधारी NDA यांच्यात राजकीय समीकरणे बदलण्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
पक्षात नाराजी; रोहित पवारांचा विरोध?
माहितीनुसार, NDAसोबत जाण्याच्या शक्यतेबाबत पक्षात एकमत नसल्याचे सांगितले जात आहे. पक्षातील काही नेत्यांनी या चर्चांबाबत नाराजी व्यक्त केली असून, आमदार रोहित पवार या निर्णयाच्या विरोधात असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीसोबत राहण्याची भूमिका कायम ठेवावी, अशी त्यांची भूमिका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
रोहित पवार नवी भूमिका मांडणार?
पक्षातील वाढत्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार लवकरच आपली भूमिका स्पष्ट करू शकतात, अशीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे पक्षासह राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे.
