जेएनएन, नवी दिल्ली. Maharashtra Hospital Fire Accident: महाराष्ट्रात 2021 ते 2026 या 5 वर्षांच्या काळात रुग्णालयांमध्ये आगीच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत. विशेषतः 2021 मधील कोविड महामारीच्या काळात अतिदक्षता विभागातील (ICU) इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील ताणामुळे मोठ्या दुर्घटना झाल्या होत्या.
अमरावती स्त्री रुग्णालयात आग
राज्यातील अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात (8 ऑगस्ट 2026) आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 3 चिमुकल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 6 नवजात बालकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले आहे.
मागील पाच वर्षातील रुग्णालयातील आगीच्या घटना
भंडारा जिल्हा रुग्णालय (9 जानेवारी 2021): 9 जानेवारी 2021 रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात अतिदक्षता कक्षात (SNCU) शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा होरपळून व गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला, तर 7 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश आले होते.
वेल ट्रिट रुग्णालय, नागपूर: 9 एप्रिल 2021 रोजी रात्री नागपूर-अमरावती रोडवरील वाडी येथील 'वेल ट्रिट कोविड रुग्णालयाला' भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीत 4 रुग्णांचा मृत्यू झाला व अनेक जण जखमी झाले. घटनेच्या वेळी 31 रुग्ण उपचार घेत होते, ज्यांना तातडीने इतरत्र हलवण्यात आले होते.
सनराईज रुग्णालय, भांडुप: 25 मार्च 2021 च्या रात्री मुंबईतील भांडुप येथील 'ड्रीम्स मॉल'च्या तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या 'सनराईज कोविड हॉस्पिटल'मध्ये भीषण आग लागली. या दुर्घटनेत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आणि अनेक रुग्ण जखमी झाले. ही आग मॉलच्या पहिल्या मजल्यावरून पसरली होती.
विजय वल्लभ रुग्णालय, विरार: 23 एप्रिल 2021 रोजी पहाटे 3:15 वाजता विरार (पश्चिम) येथील विजय वल्लभ रुग्णालयामधील अतिदक्षता विभागात (ICU) एसीच्या स्फोट व शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत 15 कोव्हिड रुग्णांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला होता,
प्राइम क्रिटिकेअर रुग्णालय, मुंब्रा: ठाण्यातील मुंब्रा येथील Prime Criticare Hospital येथे 28 एप्रिल 2021 रोजी पहाटे 3:40 वाजता आग लागली. या दुर्घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला, तर इतर 20 रुग्णांना सुरक्षितपणे इतरत्र हलविण्यात आले.
सिव्हिल रुग्णालय, अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या जिल्हा सामान्य (सिव्हिल) रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोरोनावर उपचार घेत असलेल्या 11 रुग्णांचा होरपळून आणि गुदमरून मृत्यू झाला होता.
2022 ते 2025 या काळात मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिक परिसरातील काही रुग्णालयांमध्ये लहान-मोठ्या शॉक सर्किट्सच्या घटना घडल्या, मात्र वेळेवर सुटका केल्यामुळे कोणतीही मोठी जीवितहानी नोंदवली गेली नाही.
