मुंबई/ठाणे/पुणे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ठाण्यात एकाच दिवशी दोन निर्घृण हत्याकांड घडल्याने शहर हादरले असताना, पुण्यातही पुन्हा एकदा भररस्त्यात गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सलग घटनांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

ठाण्यात 19 वर्षीय तरुणाची मित्रांकडून हत्या-

ठाण्यातील चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्याच्या धक्कादायक घटना घडली. 19 वर्षीय साहिल दिलीप पांचाळ या तरुणावर त्याच्याच काही मित्रांनी किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात साहिल गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर चितळसर-मानपाडा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अवघ्या दोन तासांत तीन आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात मित्रांमधील वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू असून हत्येमागील नेमके कारण शोधले जात आहे.

मासुंदा तलाव परिसरात आणखी एक खून-

पहिल्या हत्याकांडाची घटना ताजी असतानाच सायंकाळी ठाणे शहरातील गजबजलेल्या मासुंदा तलाव परिसरात आणखी एक खून झाल्याची घटना समोर आली. अज्ञात व्यक्तींनी एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करून त्यानंतर दगडाने ठेचून त्याची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

    हा प्रकार भरवस्तीत घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृताची ओळख पटविण्याचे आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या गस्त आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    पुण्यात पुन्हा गोळीबार; एक जण जखमी-

    दुसरीकडे, पुण्यातील धनकवडी भागातील गोळीबाराची घटना ताजी असतानाच सहकारनगर परिसरात पुन्हा गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.रात्री साडेनऊच्या सुमारास शिंदे हायस्कूलजवळील बिकानेर चौकात अज्ञात दोघांनी गोळीबार केल्याची घटना घडली.

    माहितीनुसार, तळजाई परिसराच्या दिशेने दुचाकीवरून आलेल्या दोन संशयितांनी अचानक एका व्यक्तीवर गोळीबार केला. या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाली असून स्थानिक नागरिकांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

    घटनेनंतर सहकारनगर पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करून तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जात असून गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

    वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये चिंता-

    ठाण्यात एकाच दिवशी दोन हत्याकांड आणि पुण्यात सलग गोळीबाराच्या घटना घडल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.तरुणांमधील वाढते वाद, टोळीयुद्धाचे प्रकार आणि धारदार शस्त्रे तसेच अग्निशस्त्रांचा वाढता वापर याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

    नागरिकांनी पोलिस प्रशासनाने अधिक कठोर कारवाई करावी, संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी आणि गुन्हेगारांवर त्वरित अंकुश आणावा, अशी मागणी केली आहे.

    पोलिसांचा तपास सुरू-

    ठाणे आणि पुणे या दोन्ही शहरांतील घटनांबाबत संबंधित पोलीस यंत्रणांनी स्वतंत्र तपास सुरू केला आहे. काही आरोपी ताब्यात घेतले गेले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. या घटनांमागील नेमकी कारणे आणि गुन्हेगारीची पार्श्वभूमी तपासातून पुढे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

    राज्यातील प्रमुख शहरांमध्ये वाढत्या गंभीर गुन्ह्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनासमोर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे आहे.