मुंबई. Ladki Bahin Yojana: राज्यातील ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना आता दुरुस्तीसाठी 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी ही अंतिम तारीख ३१ मार्च होती.

महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती देत, ही मुदत दुरुस्तीसाठीची शेवटची संधी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेत चुका झाले आहेत, त्यांनी तात्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

68 लाख महिला अपात्र; ई-केवायसी न केल्याचा फटका!

दरम्यान, या योजनेत मोठ्या प्रमाणात पडताळणी केल्यानंतर तब्बल 68 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे त्या योजनेच्या निकषात बसत नाही.

‘लाडकी बहीण’ योजनेत सुरुवातीला 2 कोटी 43 लाख महिलांनी नोंदणी केली होती. पात्र लाभार्थींना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जात होते.

सरकारच्या तिजोरीवरील मोठा भार कमी!

    या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर वर्षाला  43,740 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा येत होता. मात्र अपात्र लाभार्थ्यांची छाननी केल्यानंतर 68 लाख महिलांची नावे वगळण्यात आल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.या कारवाईमुळे सुमारे 12,240 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठीच अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली होती.

    लाभार्थींनी काय करावे?

    ई-केवायसी प्रक्रियेत चूक झालेल्या महिलांनी 30 एप्रिलपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा योजनेचा लाभ गमवावा लागू शकतो. शासनाकडून याबाबत विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता असून, अधिकाधिक पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा, यावर भर दिला जात आहे.