कोल्हापूर. Gokul Row: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेला पेच अखेर संपुष्टात आला आहे. कोरमअभावी तहकूब झालेली अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव केला. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुतीने निर्णायक विजय मिळवला असून, राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला पूर्णविराम

गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने वर्चस्व मिळवले होते. मात्र, राज्यातील महायुती सरकारने गोकुळच्या संचालक मंडळावर पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकीय गणित बदलले.

या नियुक्त्यांमुळे गोकुळमध्ये सत्तासंघर्षाला नवे वळण मिळाले. शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून वाद निर्माण झाला होता. त्यातच अध्यक्षपदाची पहिली निवडसभा कोरमअभावी तहकूब झाली होती. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड नेमकी कधी आणि कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

राजेश पाटील विरुद्ध शशिकांत पाटील-चुयेकर

आज निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. महायुतीप्रणित छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील-चुयेकर निवडणुकीच्या रिंगणात होते.

    दोन्ही बाजूंनी अध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. अखेर मतदान प्रक्रियेत राजेश पाटील यांनी विजय मिळवत अध्यक्षपदावर आपले नाव कोरले. त्यांच्या निवडीमुळे महायुतीने गोकुळच्या सत्तेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

    29 संचालकांनी बजावला मतदानाचा हक्क

    या निवडणूक प्रक्रियेत गोकुळचे निवडून आलेले 25 संचालक आणि मतदानाचा अधिकार असलेले चार शासननियुक्त संचालक सहभागी झाले. अशा एकूण 29 संचालकांनी मतदान केले. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 13 विरुद्ध 16 असा महायुतीचा विजय झाला. म्हणजेच शासननियुक्त चारही संचालकांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकली. शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीमुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे समीकरण बदलले होते. अखेर या नव्या राजकीय समीकरणाचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला झाला.

    महायुती सरकारच्या शासननियुक्त संचालकांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु 10 नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले. ही संपूर्ण निवडणुकीची प्रक्रिया अंतिम निकालाच्या अधीन ठेवून घेण्यास सांगितले. त्यानंतर आज गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा विजय झाला. दरम्यान सरकारचा निर्णय योग्य की अयोग्य यावर 25 नोव्हेंबरला न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.