जेएनएन, कोल्हापूर. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे.गोकुळच्या अध्यक्षपदासाठी निवडप्रक्रिया होणार असून, या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्य सरकारने गोकुळवर नियुक्त केलेल्या पाच शासननियुक्त संचालकांपैकी मतदानाचा अधिकार असलेल्या चार संचालकांची नावे त्यांनी जाहीर केली आहेत.

गोकुळच्या सत्तासंघर्षात महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये एका सरकारी आणि चार बिगरसरकारी संचालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पाचपैकी चार संचालकांना अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती.

सरकारने नावे ठेवली होती गोपनीय

शासननियुक्त संचालकांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या नावांबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या चार संचालकांची नावे कोणती, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. राज्य सरकारने या नियुक्त्यांसंदर्भातील शासन निर्णयाची (जीआर) प्रतदेखील शासकीय संकेतस्थळावर सार्वजनिक केली नव्हती. त्यामुळे या नावांबाबतचा सस्पेन्स कायम होता.

मात्र, सोमवारी कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या संघर्ष मोर्चाच्या व्यासपीठावरून त्यांनी ही नावे जाहीर केली. शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोले आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील अशी मतदानाचा अधिकार असलेल्या चार शासननियुक्त संचालकांची नावे असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणाचे पारडे जड?

    गोकुळच्या संचालक मंडळात निवडून आलेले 25 संचालक आणि पाच शासननियुक्त संचालक अशा एकूण 30 जणांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची निवडप्रक्रिया पार पडणार आहे. शासननियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार असल्याने निवडणुकीतील संख्याबळाचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडी आणि महायुती यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे.