कोल्हापूर. Kolhapur Mahapalika Nivadnuk Result 2026 कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी एकहाती मैदान मारत तब्बल 37 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसची आघाडी असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला केवळ एकच जागा जिंकता आल्याने कोल्हापूरची सत्ता काँग्रेसच्या हातातून निसटली. त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ ३ जागा कमी पडल्या. भाजपच्या खात्यात २४ जागा गेल्या. शिवसेना शिंदे गट 14 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली तर ठाकरे गटाला एक जागा मिळाली. विशेष म्हणजे कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही.
तब्बल एक दशकानंतर होत असलेल्या कोल्हापूर मनपाच्या निकालाकडे कोल्हापूरकरांचे लक्ष लागले होते. 10 वर्षानंतर काोल्हापूरला नवे कारभारी मिळणार आहेत. गेल्या जवळपास 5 वर्षापासून कोल्हापूर मनपात प्रशासकराज सुरू असून शहरातील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडाला आहे.
कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी एकमेकांच्या विरोधात लढत आहे. आज मजदान पार पडल्यानंतर दोन्ही बाजुंनी विजयाचे दावे केले जात आहे. महापालिकेच्या रणांगणात 53 माजी नगरसेवक पुन्हा नशीब आजमावत आहेत. यातील किती पुन्हा महापालिकेत जातात व किती घरी बसतात हे उद्या समजणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेवर गेल्या काही वर्षांत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिलं आहे. मात्र, राज्यात सत्ताबदलानंतर कोल्हापूरच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत. जिल्ह्यात सर्वच्या सर्व १० आमदार महायुतीचे असून एका खासदारही महायुतीचा आहे. महाविकास आघाडीकडे एका खासदार व सतेज पाटलांच्या रुपाने विधान परिषद आमदार आहे. त्याचबरोबर महायुतीकडे महाडिक गटाची ताकदही आहे.
कोल्हापूरची प्रभागरचना -
एकूण प्रभागांची संख्या : 20
● निवडून द्यावयाच्या नगरसेवकांची संख्या : 81
● 1 ते 19 प्रभागात प्रत्येक : 4 नगरसेवक
● 20 वा क्रमांक प्रभाग : 5 नगरसेवक
राजकीय परिस्थिती -
कोल्हापूर पूर्वीपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र मध्यंतरी कालखंडात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीनेही सत्ता हस्तगत केली आहे. 2015 मध्ये पहिल्यांदा राज्यात भाजपला दूर ठेवत महाविकास आघाडीचा पॅटर्न कोल्हापूर मनपात झाला होता.
2015 मध्ये कोणाला किती जागा?
2015 मध्ये काँग्रेसने 30 जागा जिंकल्या होत्या. राष्ट्रवादीने 14 जागा जिंकल्या होत्या. ताराराणी आघाडीने 19 जागा जिंकल्या होत्या, तर शिवसेनेनं 4 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीने एकत्र येत शिवसेनेच्या सोबतीने सत्ता स्थापन केली आणि भाजप आणि ताराराणी आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. मात्र, गेल्या 10 वर्षात पंचगंगेच्या पुलाखालून बरेच पाणी गेले असून महाविकास आघाडीची ताकद क्षीण झाली आहे. हसन मुश्रीफ महायुतीत गेले आहेत. तरीही महाविकास आघाडी आणि महायुतीत तुल्यबळ लढत होत आहे.
