कोल्हापूर. Kolhapur Sangharsh Morcha Gokul: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत बहुमत मिळवले असतानाच राज्य सरकारकडून पाच सरकारनियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, या निर्णयाविरोधात कोल्हापुरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात भव्य संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला हजारोंच्या संख्येने शेतकरी, दूध उत्पादक आणि नागरिक उपस्थित राहिले आहेत.
ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चातून सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. हातात काळे झेंडे आणि सरकारविरोधातील घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला आहे. आमदार सतेज पाटील यांनीही निषेधाचे प्रतीक म्हणून काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून, हातात काळा झेंडा घेऊन ते मोर्चाचे नेतृत्व करत आहेत.
गोकुळच्या निकालानंतर सरकारच्या निर्णयावरून संघर्ष
गोकुळच्या निवडणुकीत राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत या आघाडीचे पारडे जड मानले जात होते. मात्र, राज्य सरकारने गोकुळच्या संचालक मंडळावर पाच सरकारनियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. यातील चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील संख्याबळाचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे दूध उत्पादकांच्या मतदानातून व्यक्त झालेल्या जनादेशावर परिणाम होत असल्याचा आरोप सतेज पाटील गटाकडून केला जात आहे. निवडणुकीत बहुमत मिळवूनही सरकारच्या हस्तक्षेपामुळे सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याची भूमिका समविचारी आघाडीने घेतली आहे.
रस्त्यापासून न्यायालयापर्यंत लढा
सरकारच्या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील यांनी रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढा अशा दोन्ही पातळ्यांवर संघर्ष करण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यानुसार आज संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दुसरीकडे, या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले असून, या प्रकरणात न्यायालयात युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे गोकुळच्या दूध उत्पादकांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
गोकुळच्या भवितव्याचा फैसला न्यायालयीन लढाईत?
गोकुळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार मानला जातो. त्यामुळे या संस्थेच्या सत्तासंघर्षाला केवळ राजकीय लढाई न मानता दूध उत्पादकांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न म्हणूनही पाहिले जात आहे. संघर्ष मोर्चाच्या माध्यमातून सरकारच्या निर्णयाविरोधात जनमत एकवटण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केला आहे. आता रस्त्यावरील आंदोलनाला किती यश मिळते आणि न्यायालयीन लढाईत कोणाच्या बाजूने निकाल लागतो, यावर गोकुळमधील पुढील सत्तासमीकरण अवलंबून असणार आहे.
