जेएनएन, कोल्हापूर: कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील हाजगोळी येथे पोल्ट्री फार्मच्या आडून सुरू असलेल्या एमडी ड्रग्ज निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश झाल्यानंतर या प्रकरणाचे धागेदोरे आता आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करीच्या नेटवर्कपर्यंत पोहोचल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला आणि या प्रकरणातील आरोपी यांच्यात संबंध असल्याचा तपास यंत्रणांना संशय असून, या पार्श्वभूमीवर या रॅकेटचा दाऊद गँगशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. 

पुणे अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने केलेल्या कारवाईत या ठिकाणाहून सुमारे 208 ग्रॅम तयार एमडी ड्रग्ज, मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन, रासायनिक पावडर तसेच ड्रग्ज निर्मितीसाठी वापरण्यात येणारी विविध उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 1 कोटी 13 लाख 51 हजार 480 रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

पप्पू मलतवाडकर यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये कारखाना

हाजगोळी परिसरातील पप्पू विठ्ठल मलतवाडकर यांच्या मालकीच्या पोल्ट्री फार्ममध्ये हा बेकायदेशीर कारखाना सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. बाहेरून हा परिसर सामान्य पोल्ट्री व्यवसायाचा असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता. मात्र, त्याच ठिकाणी अत्यंत गुप्तपणे एमडी ड्रग्ज तयार करण्यासाठी आवश्यक रसायने आणि उपकरणांचा वापर केला जात होता. 

मुंबई, पुणे आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये अमली पदार्थांविरोधात तपास यंत्रणांनी कारवायांचा धडाका लावल्याने ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्यांनी तपास यंत्रणांच्या नजरेपासून दूर राहण्यासाठी चंदगडसारख्या दुर्गम भागाची निवड केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. जंगल आणि दुर्गम भागांनी वेढलेल्या परिसरात ड्रग्ज निर्मिती सुरू असल्यास त्याची माहिती बाहेर येण्याची शक्यता कमी असल्याने या ठिकाणाची निवड करण्यात आल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे.

सलीम डोलाचे नाव तपासात पुढे 

    या कारवाईनंतर तपास यंत्रणांनी आरोपींचे मोबाइल, आर्थिक व्यवहार, संपर्कातील व्यक्ती आणि ड्रग्ज पुरवठ्याचे नेटवर्क याचा शोध सुरू केला आहे. तपासादरम्यान कुख्यात ड्रग्ज तस्कर सलीम डोला याचे नाव समोर आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

    सलीम डोला हा मोठ्या आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी नेटवर्कशी संबंधित असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. त्यामुळे चंदगडमधील कारखाना केवळ स्थानिक पातळीवर एमडी ड्रग्ज तयार करण्यापुरता मर्यादित होता की, त्यामागे मोठे आंतरराष्ट्रीय सिंडिकेट सक्रिय होते, याचा तपास सुरू आहे. 

    महाराष्ट्रातील नेटवर्कचा तपास 

    या कारखान्यात तयार होणारे एमडी ड्रग्ज नेमके कुठे पुरवले जात होते, त्यासाठी कच्चा माल कुठून आणला जात होता आणि तयार ड्रग्जचा खप कोणत्या शहरांमध्ये होत होता, या सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. आरोपींच्या संपर्कातून मुंबई, पुणे, ठाणे आणि इतर राज्यांतील ड्रग्ज तस्करांचे नेटवर्क उघडकीस येण्याची शक्यता आहे.