एजन्सी, ठाणे: ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ महामार्गावर दोन भरधाव व्हॅनच्या धडकेत बाप-लेकासह आणखी एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले, असे पोलिसांनी सोमवारी सांगितले.
हा अपघात रविवारी सकाळी मुरबाड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर झाला.
दोन व्हॅनचा अपघात
खेडले-तळवली गावातील तीन रहिवाशांना घेऊन जाणारी पिकअप व्हॅन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पोल्ट्री व्हॅनला समोरासमोर धडकली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
धडकेच्या तीव्रतेमुळे दोन्ही वाहनांच्या समोरील कॅबिनचा चक्काचूर झाला. पिकअप व्हॅनमधील तिन्ही जणांचा जागीच मृत्यू झाला. मारुती तुकाराम खारे (55), त्यांचा मुलगा अजित मारुती खारे (25) आणि चालक राम माळू सपकाळ (40) अशी त्यांची ओळख पटली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जखमी केलं रुग्णालयात दाखल
पोल्ट्री वाहनातील दोन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने भरधाव वेगात होती. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी पोल्ट्री व्हॅनच्या चालकाविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे, असे टोकावडे पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले.
