कोल्हापूर. Gokul Milk Dairy Election: ​कोल्हापूर जिल्ह्यातील बहुचर्चित आणि प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतदारांना यलम्मादेवी तसेच बाळूमामा आणि इतर ठिकाणी शपथ घ्यायला लावून,शपथ मोडल्यास  दैवी कोपाची भीती दाखवून त्यांच्यावर मानसिक दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 दैवी शक्तीची भीती दाखवून मतदारांवर दबाव टाकणे हा जादूटोणा  विरोधी कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा असून, हे कृत्य निवडणूक आदर्श आचारसंहितेचा उघड भंग करणारे आहे. त्यामुळे संबंधित दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि निवडणूक पूर्णपणे निष्पक्ष व निर्भय वातावरणात पार पाडावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कोल्हापूर आणि बेळगाव येथील कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिले आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यात अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरवणे ही त्यांच्या विचाराला काळिमा फासणारे आहे असे देखील या मध्ये नमूद केले आहे 

​नेमके प्रकरण काय?

​गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नेत्यांकडून मतदारांना ठराविक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी यलम्मा देवीची शपथ देवून ती शपथ तोडल्यास देवी कोपाची भीती दाखवली जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. लोकांच्या धार्मिक भावनांचा आणि दैवी कोपाच्या भीतीचा गैरफायदा घेऊन मतदानावर प्रभाव पाडण्याचा हा प्रकार सुरू असल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

मागच्या निवडणुकीत शपथ मोडलेल्या व्यक्तीचे वाईट झाल्याचे दाखले देखील दिले जात आहेत 

​‘अंनिस’च्या निवेदनातील प्रमुख मागण्या:

    १) जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई : मतदारांना दैवी शक्तीची व शापाची भीती दाखवणे हा अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे. त्यामुळे शपथ मोडल्यास दैवी शक्तीचा कोप होईल असे म्हणणाऱ्या लोकावर  तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत.

    २)​आचारसंहिता भंगाचा गुन्हा: निवडणुकीत अशा प्रकारे धार्मिक गोष्टींचा वापर करून दबाव आणणे हा आचारसंहितेचा भंग असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यावर त्वरित ॲक्शन घ्यावी.

    ३)​निर्भय मतदानाची खात्री: सर्व मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय आणि दबावाशिवाय मतदान करता यावे, यासाठी प्रशासनाने निवडणूक क्षेत्रात आवश्यक ती खबरदारी व कडक उपाययोजना कराव्यात.

    ४)मतदारांनी दैवी कोपांची भीती न बाळगता निर्भयपणे आणि आपल्या सद्सदविवेक बुद्धीने मतदान करावे. दैवी दहशत निर्माण करणार्याची तक्रार प्रशासनाकडे करावी.

    ​अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर, सीमा पाटील, जोतिबा अगसमणी, मिलिंद देशमुख, राहुल थोरात, अनिल चव्हाण, रमेश  वडगणेकर,आनंद मेणसे, शंकर चौगुले यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रशासनाला इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या अनुचित व बेकायदेशीर कृत्यांना आळा न घातल्यास लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडेल. त्यामुळे संबंधित यंत्रणेने याप्रकरणी तातडीने कठोर पावले उचलावीत.