जेएनएन, मुंबई: यंदाच्या मान्सूननंतर महाराष्ट्रासह देशाच्या हवामानावर ‘एल निनो’चा प्रभाव जाणवण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम 2027 च्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याचे संकेत जागतिक हवामान संघटनेने (WMO) दिले आहेत. WMO च्या सप्टेंबरमधील अद्ययावत अंदाजानुसार, एल निनोची स्थिती डिसेंबर 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीतही कायम राहण्याची शक्यता जवळपास 100 टक्के आहे. या काळात एल निनो आणखी तीव्र होऊन वर्षअखेरीस त्याची तीव्रता उच्च पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

एल निनोमुळे तापमान आणि पर्जन्यमानाच्या पद्धतीत मोठे बदल होऊ शकतात. WMOने विशेषतः उष्णतेची तीव्रता वाढणे तसेच काही भागांत दुष्काळाचा धोका निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, एल निनोची तीव्रता आणि एखाद्या विशिष्ट भागावर होणारा परिणाम यांचा थेट संबंध असतोच असे नाही, त्यामुळे स्थानिक हवामानासाठी इतर घटकही महत्त्वाचे ठरतात. 

यंदा मान्सूनची मोठी तूट

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 2026 चा दक्षिण-पश्चिम मान्सून हंगाम देशासाठी कमकुवत ठरला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत देशभरात सरासरीच्या तुलनेत सुमारे 13 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली. यामुळे अनेक भागांत जलसाठे, जमिनीतील ओलावा आणि शेतीवर परिणाम झाला आहे.  

महाराष्ट्रातही पावसाची तूट राहिल्याने अनेक भागांत खरीप हंगामावर परिणाम झाला आहे. आता रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना जमिनीतील उपलब्ध ओलावा आणि सिंचनाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागणार आहे. 

रब्बी पिकांसाठी तीनही घटक महत्त्वाचे 

    रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी जमिनीतील ओलावा, योग्य थंडी आणि पुरेसे पाणी महत्त्वाचे असते. मान्सूनची तूट आणि त्यानंतर वाढणारे तापमान यामुळे या तिन्ही घटकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

    ऑक्टोबरमध्ये जमिनीतील ओलावा कमी होत गेला आणि तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले, तर रब्बीच्या पेरणीच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. त्यानंतर हिवाळ्यातही तापमानाचा कल महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे यंदाचा रब्बी हंगाम हवामानाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतो.

    मुंबईसह कोकणात ‘ऑक्टोबर हिट’

    दरम्यान, मान्सूनच्या परतीची प्रक्रिया सुरू झाल्याने महाराष्ट्रात आता उष्णता वाढण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील काळात कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2 ऑक्टोबरच्या अहवालानुसार, मुंबईच्या तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची वाढ होऊन ते 35 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. 

    पावसाचे प्रमाण कमी होत असताना आर्द्रता कायम राहिल्यास मुंबई आणि कोकणात उकाड्याची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे मान्सूननंतरच्या काळात नागरिकांना उष्णता आणि दमट हवामानाचा दुहेरी सामना करावा लागू शकतो.