जेएनएन, कल्याण. बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) तपास सुरू केला आहे. स्त्रीबीजांच्या बेकायदा तस्करीतून मिळवलेल्या कथित काळ्या पैशांचा माग काढण्यासाठी ईडीच्या विशेष पथकाने उल्हासनगरमध्ये एका महिला आरोपीच्या घरावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान संबंधित महिलेच्या बँक खात्यांचे तपशील, मालमत्तेची कागदपत्रे आणि इतर आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

बदलापूर परिसरातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या स्त्रीबीजांची बेकायदा तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराज्यीय टोळीपर्यंत पोहोचल्याने पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासाठी ईडीनेही तपासाची सूत्रे हाती घेतले आहे.

उल्हासनगरमधील महिला आरोपीच्या घराची झडती 

माहितीनुसार, ईडीच्या विशेष पथकाने आज सकाळी उल्हासनगर कॅम्प क्रमांक ४ मधील सुभाष टेकडी परिसरातील दहा चाळ भागात एका महिला आरोपीच्या घरावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान पथकाने घराची झडती घेत विविध आर्थिक कागदपत्रांची तपासणी केली. संबंधित महिलेच्या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांचा तपशील, मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आणि इतर आर्थिक नोंदी तपासण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

स्त्रीबीज तस्करीच्या माध्यमातून किती आर्थिक व्यवहार झाले, या व्यवहारांमधून कोणाला आर्थिक लाभ झाला आणि या पैशांचा वापर कुठे करण्यात आला, याचा शोध घेण्याचा ईडीचा प्रयत्न असल्याचे समजते. मात्र, या कारवाईत नेमकी कोणती कागदपत्रे किंवा पुरावे हाती लागले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हवाला व्यवहारांचाही तपास? 

    या प्रकरणात महिलांना स्त्रीबीज देण्यासाठी पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत पैशांची देवाणघेवाण कशा पद्धतीने झाली, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. संबंधित आर्थिक व्यवहार बँक खात्यांद्वारे झाले की हवाला किंवा अन्य बेकायदा माध्यमांचा वापर करण्यात आला, याची पडताळणी तपास यंत्रणांकडून केली जात असल्याची माहिती पोलिसाकडून मिळाली आहे. 

    या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचे जाळे किती व्यापक आहे, तस्करीतून मिळालेल्या पैशांचा लाभ अन्य व्यक्तींनाही झाला आहे का आणि या व्यवहारांमागे आणखी कोणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का, या दिशेने तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांने दिली आहे. 

    आंतरराज्यीय टोळीचे धागेदोरे शोधण्याचे आव्हान 

    बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणात महिलांना आर्थिक प्रलोभन दाखवून त्यांची फसवणूक करण्यात आली का, स्त्रीबीज संकलन आणि त्याच्या पुढील व्यवहारांमध्ये कोणत्या व्यक्ती किंवा संस्थांचा सहभाग होता, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र तपासणी सुरू झाल्याने संबंधित आरोपींच्या आर्थिक स्रोतांची आणि मालमत्तेची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.