सोलापूर/अमरावती/बुलढाणा. राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे काही भागांत अतिवृष्टी आणि पुरामुळे पिकांचे नुकसान झाले असताना, आता बुलढाणा, सोलापूर आणि अमरावतीसारख्या महत्त्वाच्या कृषी जिल्ह्यांमध्ये पावसाने पाठ फिरवल्याने उभी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. डौलाने उभी असलेली सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिके पाण्याअभावी माना टाकू लागल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

बुलढाण्यात सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

सोयाबीन आणि कापसाचा महत्त्वाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. खरीप हंगामात मोठ्या अपेक्षेने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पिके वाचवण्याचे मोठे आव्हान उभे आहे.

सुरुवातीला झालेल्या पावसाच्या जोरावर पिकांनी वाढ घेतली. मात्र त्यानंतर आवश्यक वेळी पाऊस न पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी अनेक ठिकाणी सोयाबीन आणि कापसाची पिके सुकू लागली असून, उत्पादनावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मशागतीचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता पावसाअभावी उत्पादन घटल्यास हा खर्चही भरून निघणार नसल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

सोलापुरात सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ-

    सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या ओढीमुळे खरीप पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील शेतकरी पंडित शिवप्पा बादोले यांच्यावर उभ्या सोयाबीन पिकावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली आहे.

    मोठ्या कष्टाने आणि अपेक्षेने उभे केलेले सोयाबीनचे पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर गेल्याने अखेर त्यांनी पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला. डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत नष्ट होत असताना शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.

    गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. यंदा मात्र पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर केलेला मोठा खर्च वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने आर्थिक चिंता वाढली आहे.

    घोळसगावसह अक्कलकोट तालुक्यातील अनेक भागांत पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम होत असल्याने प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावी, पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    अमरावतीत सोयाबीनच्या शेंगा न भरल्याने उत्पादनाची चिंता

    विदर्भातील प्रमुख कृषी जिल्ह्यांपैकी एक असलेल्या अमरावतीमध्येही पावसाने दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते.

    सुरुवातीला कमी पाऊस असूनही शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने आणि अपेक्षेने सोयाबीनची पेरणी केली. मात्र पीक बहरात येण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा अपेक्षेप्रमाणे भरल्या नसल्याची परिस्थिती असून, उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

    भातकुली तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली असून, काही हताश शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात बैल चरायला सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

    कर्जबाजारी शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान

    पेरणी आणि शेतीसाठी अनेक शेतकऱ्यांनी बँका तसेच खासगी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. मात्र पावसाअभावी उत्पादनात मोठी घट झाल्यास कर्जाची परतफेड कशी करायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.

    एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना दुसरीकडे हवामानाच्या अनिश्चिततेमुळे पीक हातातून जाण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने नुकसानग्रस्त भागांची पाहणी करावी, पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी बुलढाणा, सोलापूर आणि अमरावती जिल्ह्यांतील शेतकरी करत आहेत.

    पावसाची प्रतीक्षा, शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे

    राज्यातील अनेक भागांत आता खरीप पिकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर सोयाबीन, कापूस आणि इतर खरीप पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले असून, पावसाचे पुनरागमन होते का आणि उभी पिके वाचतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.