जेएनएन, मुंबई: मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून (Delimitation Bill 2026) देशातील राजकीय वातावरण तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही या विषयावर सावध भूमिका घेतली आहे. पक्षाची 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या संभाव्य परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे, या चर्चेदरम्यान राज्यातील बहुतांश जिल्हाध्यक्षांचा विधेयकाच्या बाजूने कल असल्याचे समोर आले आहे.
या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते आणि राज्यातील विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मतदारसंघ पुनर्रचनेच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका निश्चित करण्यापूर्वी तळागाळातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांनी केला. त्यानुसार प्रत्येक जिल्हाध्यक्षाला आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. राज्यातील राजकीय आणि लोकसंख्येच्या बदलत्या परिस्थितीचा विचार करता या विधेयकाकडे कसे पाहिले पाहिजे, यावर बैठकीत चर्चा झाली.
लोकसंख्या वाढीमुळे मतदारसंघ विभाजनाची गरज
बैठकीत काही जिल्हाध्यक्षांनी राज्यातील वाढत्या लोकसंख्येचा मुद्दा उपस्थित केला. गेल्या काही वर्षांत अनेक विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमधील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मतदारसंघांचे भौगोलिक क्षेत्र आणि मतदारसंख्येतील असमतोल दूर करण्यासाठी पुनर्रचना आवश्यक असल्याचे मत काही पदाधिकाऱ्यांनी मांडले. लोकसंख्येच्या प्रमाणात मतदारसंघांची संख्या वाढल्यास लोकप्रतिनिधींना मतदारांपर्यंत पोहोचणे आणि स्थानिक प्रश्न सोडवणे अधिक सोपे होऊ शकते, असा युक्तिवादही करण्यात आला.
यामुळे बहुतांश जिल्हाध्यक्षांचा या विधेयकाला अनुकूल प्रतिसाद असल्याचे बैठकीतील चर्चेतून स्पष्ट झाले. मात्र, विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत पक्षात सर्वांचे एकमत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान मतदारसंघ पुनर्रचनेच्या प्रक्रियेचा राजकीय फायद्यासाठी वापर होण्याची शक्यता आणि त्यातून राज्यांमधील राजकीय प्रतिनिधित्वावर होणारे परिणाम याबाबतही पक्षात चिंता व्यक्त केली जात आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या...
संसदेच्या विशेष अधिवेशनात 'सीमांकन विधेयक' (Delimitation Bill) मांडले जाण्याबाबतच्या चर्चांवर भाष्य करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "अधिवेशनाची घोषणा झाली आहे, परंतु माझ्याकडे अजेंडा (कार्यसूची) आलेला नाही. मी अजून विधेयक पाहिलेले नाही. जोपर्यंत मी विधेयक पाहत नाही, तोपर्यंत मी काहीही सांगू शकत नाही..."
#WATCH | Mumbai: On speculations about the Delimitation Bill to be tabled during Parliament’s Special Session, NCP-SCP MP Supriya Sule says, "The session has been announced, but I don't have the agenda. I have not seen the bill yet. Until I see the bill, I cannot say anything..." https://t.co/cFOOpzRbYD
— ANI (@ANI) November 27, 2026
सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेमुळे चर्चेला महत्त्व
यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणासह प्रत्येक राज्यातील लोकसभा आणि विधानसभा जागांमध्ये 50 टक्के वाढ करण्याची तरतूद असेल, तर विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक विचार करता येईल, असे संकेत दिले होते. दुसरीकडे, आमदार रोहित पवार आणि पक्षाच्या युवा संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी या विधेयकाबाबत आक्षेप नोंदवले आहेत. भाजपकडून मतदारसंघ पुनर्रचनेचा राजकीय फायद्यासाठी वापर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पक्षातील वेगवेगळ्या मतप्रवाहांच्या पार्श्वभूमीवर 26 नोव्हेंबरच्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
विधेयकाचा अभ्यास केल्यानंतरच अंतिम निर्णय
दरम्यान, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाबाबत कोणताही घाईघाईने निर्णय घेण्याचे पक्षाने टाळले आहे. विधेयकातील नेमक्या तरतुदी, जागांच्या वाढीचे सूत्र, राज्यनिहाय प्रतिनिधित्व आणि महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीशी असलेला संबंध या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. संसदेत विधेयक मांडल्यानंतर पक्षाचे खासदार त्यातील तरतुदींचा अभ्यास करतील आणि त्यानंतरच पक्षाची अधिकृत भूमिका निश्चित केली जाईल, अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही स्पष्ट केली आहे.
