एजन्सी, ठाणे: ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणपती उत्सवासाठी गोळा केलेल्या निधीवरून झालेल्या वादानंतर एका गणेश मंडळाच्या सदस्याने आपल्या मित्राची हत्या केल्याचा आरोप आहे, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले.

जात होता आंध्र प्रदेशात पळून

ही घटना रविवारी रात्री घडली आणि आरोपी आंध्र प्रदेशातील आपल्या मूळ गावी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला कल्याण रेल्वे स्थानकावरील एका ट्रेनमधून सोमवारी 12 तासांच्या आत ताब्यात घेण्यात आले, असे त्यांनी सांगितले.

अंबरनाथमधील 'ओबीएन मित्र मंडळा'चे सदस्य 

मृत तरुण संदीप दिलीप मढीवाळ (29) आणि आरोपी गोविंद रामलू कोळी उर्फ चिन्ना (30) हे अंबरनाथमधील 'ओबीएन मित्र मंडळा'चे सदस्य होते. मढीवाळने कोळीला उत्सवासाठी जमा केलेल्या आणि त्याच्याकडे असलेल्या निधीबाबत विचारणा केली असता त्यांच्यात वाद निर्माण झाला.

विचारणा केल्याने संतप्त झालेल्या कोळीने मढीवाळला बेदम मारहाण करून ठार मारले आणि घटनास्थळावरून पळ काढला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. 

    माहिती मिळताच पोलिसांनी चक्रे हलवली आणि तपास सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांच्या तीन पथकांनी रेल्वेगाड्यांमध्ये शोध घेतला आणि कोळीला एका जनरल डब्यातून पकडले. नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

    आरोपीविरुद्ध हत्येच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी पुढे सांगितले.