मुंबई. देशभरातील विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी राजीनामा देताच महाराष्ट्राच्या राजकारणातही घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील शासकीय महापूजा पूर्ण करताच तातडीने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप त्यांच्या दिल्ली दौऱ्याचे अधिकृत कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू असून त्यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे या चर्चांना खतपाणी मिळालं आहे.  धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा करताना विद्यार्थ्यांचे भविष्य आणि देशातील निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावर दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर हा प्रश्न अधिक तीव्र झाला होता. या आंदोलनाला विविध विद्यार्थी संघटना तसेच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पहाटे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात राज्याच्या वतीने शासकीय महापूजा केली. महापूजेनंतर ते सोलापूरहून विशेष विमानाने दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार फडणवीस दुपारपर्यंत दिल्लीत दाखल झाले. मात्र, त्यांना केंद्रीय नेतृत्वाने कोणत्या कारणासाठी तातडीने बोलावले याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकार पुढील राजकीय रणनीती, आंदोलनाची परिस्थिती आणि आगामी निर्णयांवर चर्चा करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांशी बैठक घेण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप कोणतीही सार्वजनिक प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच या विषयावर अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.