रत्नागिरी. Dapoli waqf land scam: दापोली शहरातील उदयनगर परिसरातील वक्फ बोर्डाच्या तब्बल 621 गुंठे जमिनीच्या कथित गैरव्यवहाराचा आरोप समोर आल्याने रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या जमिनीची परस्पर विक्री करून त्यावर इमारती आणि बंगले उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने संबंधित व्यक्तींना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे.

ही जमीन काझी रहमान काझी इसा या वक्फ संस्थेशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, या जमिनीचा वक्फ पूर्वीपासून अस्तित्वात असून सुमारे 1897 पासून या मालमत्तेचा वक्फशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर या जमिनीच्या मालकी व हस्तांतरणासंदर्भात विविध व्यवहार झाल्याचा आरोप आहे.

180 आणि 441 गुंठ्यांचे व्यवहार?

माजी स्वीकृत नगरसेवक संजय सावंत यांनी या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, 621 गुंठ्यांच्या जमिनीचे दोन स्वतंत्र खरेदीखतांद्वारे 180 गुंठे आणि 441 गुंठे, अशा स्वरूपात व्यवहार झाल्याचे कागदपत्रांमधून दिसून येते. या व्यवहारात बिल्डर व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचा संबंध असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. 

या प्रकरणात वक्फ मंडळाची आवश्यक परवानगी न घेता जमीन विक्री अथवा हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याच जमिनीवर बांधकामे झाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे जमीन व्यवहारासोबतच या बांधकामांच्या वैधतेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

शिंदे शिवसेनेच्या उपनगराध्यक्षांचे नाव चर्चेत

    या प्रकरणामुळे दापोलीच्या राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. शिंदे शिवसेनेचे दापोलीतील उपनगराध्यक्ष खालीद रखांगे यांचा या प्रकरणातील संबंधित व्यक्तींमध्ये समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रखांगे आणि भेकरे या बिल्डर व्यावसायिकांच्या सहभागाबाबतही आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांवर संबंधित व्यक्तींची अधिकृत बाजू अद्याप समोर आली नाही. 

    44 जणांना वक्फ बोर्डाची नोटीस

    या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाने 44 जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती समोर आली आहे. नोटिशीत वक्फ मंडळाच्या परवानगीशिवाय संबंधित जमीन विक्री अथवा हस्तांतरित का करण्यात आली, याचा खुलासा करण्यास सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच संबंधितांनी सात दिवसांच्या आत उत्तर द्यावे आणि जमीन वक्फच्या ताब्यात का घेऊ नये, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई का करू नये, याबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. 

    सावंत यांच्याकडून कागदपत्रे सादर

    संजय सावंत यांनी माध्यमांसमोर कागदपत्रे सादर करत या संपूर्ण व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. वक्फच्या मालकीची जमीन कथितरीत्या खासगी व्यक्तींच्या आणि बिल्डर लॉबीच्या ताब्यात गेली असल्याचा त्यांचा आरोप आहे. संबंधित व्यवहारांची महसूल नोंद, खरेदीखते, वक्फ मंडळाच्या नोंदी आणि बांधकामांना मिळालेल्या परवानग्या यांची तपासणी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

    वक्फ मालमत्तांच्या बेकायदेशीर हस्तांतरणाबाबत देशभरातून तक्रारी होत असल्याचे केंद्र सरकारच्या माहितीतही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दापोलीतील 621 गुंठ्यांच्या या प्रकरणात प्रत्यक्ष कागदपत्रे, जमीन नोंदी आणि वक्फ मंडळाच्या परवानग्यांची चौकशी झाल्यानंतरच व्यवहाराची कायदेशीर स्थिती स्पष्ट होणार आहे. 

    दरम्यान, या प्रकरणातील आरोप अद्याप आरोपांच्या स्वरूपात असून संबंधित व्यक्तींची बाजू आणि अधिकृत चौकशीचा निष्कर्ष समोर आल्यानंतरच गैरव्यवहाराची अंतिम वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.