मुंबई. Arnab Cyclone Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर या चक्रीवादळाची तीव्रता हळूहळू कमी होत असली, तरी त्याच्या प्रभावामुळे राज्यातील काही भागांत हवामानात बदल होण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील घाटमाथ्याच्या भागांसाठी हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला असून, काही जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

आज कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

हवामान विभागाच्या माहितीनुसार,राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.

* कोकण: रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत पावसाची शक्यता.

* मध्य महाराष्ट्र: नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांसह पुणे व सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर पावसाचा अंदाज.

* मराठवाडा: जालना जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

    * विदर्भ: अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

    विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

    ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. चक्रीवादळ पुढे सरकत असताना त्याची तीव्रता कमी होत असली, तरी त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

    शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता

    राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज असल्याने काढणीला आलेल्या पिकांबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे काढणी केलेली पिके, शेतीमाल आणि शेतातील कामांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.