नांदेड, नांदेड जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी नांदेड-भोकर रस्त्यावर एका प्रवासी व्हॅन व ट्रकला समोरासमोर झालेल्या धडकेत होऊन झालेल्या अपघातात किमान सहा जणांचा मृत्यू झाला आहे आणि आठ जण गंभीर जखमी आहेत.
हा अपघात गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सीताखंडी घाटाजवळ झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नांदेडहून भोकरच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मॅजिक व्हॅनची समोरून येणाऱ्या ट्रकशी धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, यामुळे व्हॅनचा चक्काचूर झाला. स्थानिक रहिवासी घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी गाडीतून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली, असे पोलिसांनी सांगितले. जखमींना तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.
मृत झालेल्या पाच प्रवाशांची ओळख पटली असून पांडुरंग वाघमारे, लक्ष्मीबाई वाघमारे, सय्यद अल्तमाश, शेख फिरोज आणि बलवान पवार अशी मृतांची नावे आहेत. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
