छत्रपती संभाजीनगर - सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारतीय रेल्वेची फर्स्ट एसी केबिन एका नवविवाहित जोडप्यासाठी 'हनिमून सूट'मध्ये रूपांतरित केल्याचे दिसत आहे. या रोमँटिक डब्याच्या व्हिडिओने लोकांना थक्क केले आहे आणि ऑनलाइन त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
भारतीय रेल्वेच्या एका ट्रेनमध्ये करण्यात आलेली अनोखी सजावट आता चर्चेचा विषय बनली आहे. महाराष्ट्राकडे जाणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसमधील नवविवाहित जोडप्यासाठी एसीचा डबा आलिशान हॉटेलच्या हनिमून सुइटप्रमाणे सजवण्यात आला होता. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या. पण जेव्हा हे प्रकरण रेल्वे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा ते नियमांचे आणि सुरक्षा मानकांचे उल्लंघन असल्याचे दिसून आले. यानंतर, संबंधित तिकीट तपासनीसाला (टीटीई) तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली.
व्हायरल व्हिडिओमध्ये ट्रेनचा फर्स्ट एसी डबा रंगीबेरंगी फुगे, ताजी फुले आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी आकर्षकपणे सजवण्यात आला होता. एवढंच नाही तर, केबिनच्या भिंतीवर 'आय लव्ह यू' असा संदेशही लिहिला होता. पहिल्यांदा पाहिल्यावर ती हॉटेलमधली एखादी खास रुम वाटत होती. याच कारणामुळे त्या व्हिडिओने इंटरनेटवर लोकांचे लक्ष पटकन वेधून घेतले.
रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना 6 जुलै रोजी महाराष्ट्रातील जालना रेल्वे स्थानकावर मुंबई सीएसएमटी-बल्हारशाह-नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये घडली.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीटीई निलंबित-
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी ए. श्रीधरन म्हणाले की, जालना येथील टीटीईला निलंबित करण्यात आले असून अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. असे दिसते की, फर्स्ट एसी केबिन सजवण्यासाठी एका इव्हेंट स्टायलिंग सेवेला नियुक्त करण्यात आले होते. टीटीईने त्या कंपनीला ट्रेनमध्ये प्रवेश द्यायला नको होता.
What’s happening here 🥺😭🥺😭🥺😭 pic.twitter.com/PGW1TqmyWc
— Godman Chikna (@Madan_Chikna) July 7, 2026
फर्स्ट AC केबिन ''हनीमून सुइट''मध्ये रूपांतरित -.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये फर्स्ट एसी कॅबिन फुगे, फुले आणि हजारो गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेली दिसत असून, भिंतीवर 'आय लव्ह यू' असा संदेश लिहिलेला आहे. ट्रेन धावत असताना हा डबा एका रोमँटिक वातावरणात रूपांतरित झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
जालना येथून कार्यरत असलेल्या इव्हेंट स्टायलिंग सेवेने या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिला. या फर्मने यापूर्वी सांगितले होते की, नंद्रीग्राम एक्सप्रेसची पहिली एसी केबिन जालना येथील एका जोडप्यासाठी बुक करण्यात आली होती, ज्यांनी छत्रपती संभाजीनगर ते जालना स्टेशनपर्यंत कारने प्रवास केला होता.
कंपनीने सांगितले की त्यांच्या टीमने ट्रेनचा डबा आधीच सजवला होता, परंतु डबा सजवण्यासाठी कोणत्याही अधिकृत परवानगीची आवश्यकता असल्याची त्यांना माहिती नव्हती.
