जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात खवड्या डोंगरावर घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांची ओळख पटली असून, ते देवळाई चौक परिसरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.

मृतांमध्ये कुणाल मुरलीधर चांदवडे (वय १८ वर्षे), त्याचे वडील मुरलीधर चांदवडे आणि आई संगीता मुरलीधर चांदवडे यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूमुळे देवळाई चौक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, कुणालचा डोंगरावरून तोल गेल्यानंतर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना त्याचे वडील मुरलीधर चांदवडे यांचाही तोल गेला. डोळ्यांसमोर मुलगा आणि पतीला डोंगरावरून खाली पडताना पाहिल्यानंतर संगीता चांदवडे यांना हा आघात सहन झाला नाही. त्यानंतर त्यांनीही डोंगरावरून उडी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, तिघे डोंगरावर नेमके कोणत्या कारणासाठी गेले होते आणि घटनेचा संपूर्ण क्रम काय होता, याचा तपास केला जात आहे.

एका क्षणात संपूर्ण कुटुंब संपुष्टात आल्याने देवळाई चौक परिसरात शोककळा पसरली आहे. कुणालच्या अपघातानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचा जीव गेला आणि पती-पुत्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईनेही जीवन संपवल्याची ही घटना अत्यंत वेदनादायक असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

पोलिस तपासानंतरच या घटनेतील संपूर्ण सत्य समोर येणार आहे

हेही वाचा: Maharashtra Crime News: शाळेत 10 वर्षीय विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडून अत्याचार, गुन्हा दाखल