जालना (एजन्सी) -  जालना शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका तीन वर्षांच्या मुलीचे लचके तोडून तिला ठार मारले. ही घटना सोमवारी पहाटे घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, यशवंत नगर परिसरात ही घटना घडली जेव्हा मुलगी पहाटे ३.३० च्या सुमारास तिच्या घराबाहेर आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परी गोस्वामी असे या चिमुकलीचे नाव असून, ती रविवारी तिच्या आई आणि मोठ्या बहिणीसोबत बिहारमधील त्यांच्या मूळ गावी जाणार होती, परंतु तिने तिच्या वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

तिचे वडील झोपलेले असताना, परी तिच्या आईला शोधण्यासाठी घराबाहेर पडली आणि रस्त्यावर भटकत राहिली, तिथे भटक्या कुत्र्यांच्या टोळीने तिच्यावर हल्ला केला आणि तिला जवळच्या मोकळ्या जागेत ओढून नेत तिचे लचके तोडले. 

मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलला भटकी कुत्री लहान बालकावर हल्ला करत असल्याचे दिसले. त्यांनी काठी घेऊन कुत्र्यांना हाकलून लावले व  स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आणि गंभीर जखमी झालेल्या मुलीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. तहसील पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.