मुंबई. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपयांच्या कथित देवाण-घेवाणीचा उल्लेख असलेली ऑडिओ क्लिप सार्वजनिक केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणावरून भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्येही आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले. आता या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (SIT) सक्रिय झाले असून, तपास पथकाने मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. त्यामुळे या कथित ऑडिओ क्लिपच्या चौकशीला वेग येण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 22 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत ही कथित ऑडिओ क्लिप ऐकवली होती. या क्लिपमध्ये भाजपकडून जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये दिल्याचा आणि हा कथित व्यवहार शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यामुळे सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना या दोन घटक पक्षांमध्येही राजकीय वाद निर्माण झाला.
मात्र, जरांगे पाटील यांनी आपण कोणाकडूनही 500 कोटी रुपये घेतले नसल्याचे स्पष्ट केले होते. ‘मला 500 कोटी रुपये दिले म्हणून माझ्या नावाने भाजपकडून कुणी पैसे घेतले का? मला खरंच पैसे दिले का? माझ्या नावाने कोणी व्यवहार केला असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या प्रकरणामागे आपली आणि मराठा आरक्षण आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर SIT स्थापन
या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासून संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मुंबई पोलिसांनी 26 ऑक्टोबर रोजी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करत आहे. पोलीस उपायुक्त विजयकांत सागर आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे यांचा या पथकात समावेश आहे.
ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी होणार
या तपासात ऑडिओ क्लिप मूळ स्वरूपातील आहे की त्यामध्ये तांत्रिक बदल करण्यात आले आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. क्लिपमधील आवाज नेमके कोणाचे आहेत, संभाषण कधी आणि कुठे रेकॉर्ड करण्यात आले, तसेच ही क्लिप कोणामार्फत बाहेर आली, याचाही तपास केला जाणार आहे.
