जेएनएन, सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे एक मोठी दुर्घटना घडली. येथील एका शेतात बंद बोअरवेलमध्ये दीड वर्षाची चिमुकली कोसळली होती. या दीड वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उष्मती राहुल गावित (रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे.
22 नोव्हेंबरला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जळोली साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली होती. ही बोअरवेल अंदाजे 45 ते 50 फूट होती. ही माहिती जिल्हा प्रशासनाला मिळताच त्यांनी बचावकार्य सुरु केले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते.
23 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाने बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
