जेएनएन, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथून शेतकऱ्यांची थट्टा उडवणारी बातमी समोर आली आहे. येथील वरुडी गावच्या एका शेतकऱ्याने 1262 किलो कांदा विकला होता. त्याला एक रुपया प्रतिकिलो असा भाव मिळाला आहे. त्यामुळे या शेतकऱ्याच्या हातात एक रुपयाही उरला नाही. उलट बाजार समितीचे शुल्क भरताना त्याला स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागले, अशी घटना समोर आली आहे.
उन्हाळ कांदा निघायला सुरुवात झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला कांदा विकण्यासाठी आणत आहेत. मात्र, बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच शासनाचीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांप्रति उदासिनता दिसून येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रकाश गलधर यांनी 25 गोणी कांदा विक्रीसाठी आणला होता. अनेक महिन्यांच्या मेहनतीनंतर, उन्हातान्हात राबून त्यांनी हे पीक उभं केलं होतं. मात्र बाजारात जेव्हा लिलाव झाला, तेव्हा कांद्याला इतका कमी भाव मिळाला की हमाली, तोलाई, वाराई, गोणी खर्च आणि इतर कपातींनंतर त्यांच्या हाती काहीच उरलं नाही. उलट 1 रुपया स्वतःच्या खिशातून भरावा लागला. या घटनेची पावती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.

‘मुलीच्या लग्नाला घेतलेले पैसे परत करायचेत’
"मी 3 मे रोजी चार एकरात पिकवलेला कांदा विकण्याचा प्रयत्न केला. खूपच कमी भाव मिळाल्याने, जड अंतःकरणाने मी उरलेला माल फेकून दिला," असं माध्यमांशी प्रतिक्रिया देताना शेतकरी प्रकाश गलधर म्हणाले.
या नुकसानीमुळे त्यांच्या आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगिलतं की, "मी दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलीचे लग्न केले आणि अजूनही वेगवेगळ्या लोकांकडून घेतलेले पैसे परत करायचे आहेत. कांद्याच्या संकटामुळे मी खचून गेलो आहे," असे ते म्हणाले.
