जेएनएन, मुंबई. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी अनेक आंदोलने केली होती. नुकतेच, त्यांनी मुंबईत एक मोठे आंदोलन केले. त्यात त्यांना यश मिळाले आणि राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता हैदराबाद गॅझेटनुसार, मराठवाड्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झाली आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या औचित्याने आज मराठवाड्यात जात प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. हिंगोलीमध्ये सर्वाधिक जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले. हिंगोली जिल्ह्यातील पन्नास मराठा बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
हिंगोलीत पन्नास मराठा बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये आजपासून हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी दाखले दिले जात आहेत. हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते जिल्ह्यातील पन्नास मराठा बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त चार कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. राज्य सरकारच्या नवीन जीआर नुसार, लातूर जिल्ह्यातील दोन जणांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
मराठा आणि कुणबी एकच आहेत, असा दावा मनोज जरांगे करत आले आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची त्यांची मागणी आहे. मुंबईतील आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट आणि औंध गॅझेट लागू करण्याच्या मागणीवर त्यांच्यासोबत बोलणी केली.
हैदराबाद गॅझेट तत्काळ लागू करण्यासाठी जीआर काढण्यात आला आणि 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर असे पाच दिवस मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनाचा समारोप झाला. हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय (जीआर) 2 सप्टेंबरला निघाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांमध्ये 17 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले मिळण्यास सुरुवात झाली आहे.