बीड. Manoj Jarange Called Off Hunger Strike: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांनी आज, स्थगित केले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी हा निर्णय जाहीर केला. मात्र, उपोषण स्थगित केले असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी तीन महिन्यांची मुदत दिली असून, या कालावधीत सातारा गॅझेट लागू करण्याची मागणी केली आहे.
पाटोद्यात सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा
मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र, पाटोदा येथे त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम झाला होता. दीर्घ उपोषणामुळे निर्जलीकरणाचा धोका निर्माण झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी सरकारचे शिष्टमंडळ पाटोदा येथे दाखल झाले. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस आणि बीडचे जिल्हाधिकारी यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर आंदोलनाबाबत तोडगा काढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बैठक पार पडली.
सरकारला तीन महिन्यांची मुदत
चर्चेनंतर मनोज जरांगे यांनी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्याची घोषणा केली. या कालावधीत मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांवर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः सातारा गॅझेट लागू करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ सरकारला देत असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू सातारा गॅझेटसह मराठा समाजाच्या कुणबी नोंदी आणि आरक्षणाशी संबंधित मागण्यांवर राहिला आहे. सरकारने यापूर्वी काही मागण्यांवर निर्णय घेतल्याचे सांगितले होते, तर काही मागण्यांवर कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असल्याची भूमिका सरकारकडून मांडण्यात आली होती.
VIDEO | Beed: Maratha quota activist Manoj Jarange calls off his 20 day old fast.
— Press Trust of India (@PTI_News) September 17, 2026
He warns the Maharashtra government that he will take the protest to Mumbai if his demands over Maratha reservation are not considered within three months.
(Full video available on PTI Videos -… https://t.co/YoxrYpSAUS pic.twitter.com/GzwIHOOsm0
‘धोका दिला तर मुंबई गाठणार’
सरकारला तीन महिन्यांची मुदत देतानाच मनोज जरांगे यांनी स्पष्ट इशाराही दिला आहे. “सरकारने धोका दिला तर आम्ही मुंबई गाठणार,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्यामुळे सध्या मुंबईकडे सुरू असलेला नियोजित मोर्चा आणि आझाद मैदानावरील आंदोलनाचा कार्यक्रम तात्पुरता स्थगित होण्याची शक्यता आहे. यापूर्वी जरांगे यांनी 19 किंवा 20 सप्टेंबरच्या आसपास मुंबईत पोहोचून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र, त्यांच्या प्रकृतीची स्थिती आणि सरकारसोबत झालेल्या चर्चेनंतर आता त्यांनी तीन महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
‘उपोषण स्थगित, आंदोलन सुरूच राहणार’
मनोज जरांगे यांनी आपल्या भूमिकेतील महत्त्वाचा फरक स्पष्ट केला आहे. “मी आज उपोषण स्थगित करतो, मात्र आंदोलन सुरूच राहणार,” असे त्यांनी जाहीर केले.
