बीड. Manoj Jarange Beed: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गात अनेक अचडणी येत असतानाच आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात येत आहे. १९व्या दिवशीही त्यांचे उपोषण सुरू असून, पाणी आणि सलाईन घेणे बंद केल्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत बुधवारी सकाळी पाटोद्यातून पुढील मुक्काम असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याकडे ते रवाना होणार की पाटोद्यातच विश्रांती घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. पहिल्या टप्प्यात मोठा प्रवास करून ते बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पोहोचले. नियोजित वेळेपेक्षा उशिरा पाटोद्यात पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी मराठा समाजबांधवांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने त्यांची शारीरिक स्थिती अधिकच खालावत असल्याची माहिती समोर आली आहे.
आज श्रीगोंद्याकडे जाणार की पाटोद्यातच थांबणार?
जरांगे पाटील यांच्या मुंबई दौऱ्याचे नियोजन आधीच निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार पाटोदा येथील मुक्कामानंतर बुधवारी श्रीगोंदा, त्यानंतर 17 सप्टेंबरला पुण्यातील हडपसर आणि 18 सप्टेंबरला खोपोली येथे मुक्काम करण्याचे नियोजन आहे. 19 सप्टेंबरला मुंबईत दाखल होऊन आझाद मैदानात आंदोलन करण्याचा त्यांचा निर्धार आहे.
मात्र, पाटोद्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने या नियोजित प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सकाळपासून त्यांना प्रकृतीच्या त्रासामुळे विश्रांती घ्यावी लागत असल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला आणि त्यांच्या प्रकृतीची स्थिती पाहता पुढील प्रवासाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
19व्या दिवशी उपोषण; पाणी-सलाईनही बंद
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस आहे. मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी पाणी, सलाईन आणि उपचार बंद करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. वैद्यकीय पथकाकडून त्यांची तपासणी केली जात आहे. पाटोद्यात डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली. जरांगे यांनी उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे डॉक्टरांनी म्हटले.
पाटोद्यातील रात्रीच्या सभेनंतर त्यांच्या प्रकृतीची स्थिती पाहता समर्थकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे. हात-पाय हलवणेही कठीण होत असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईकडे जाण्याच्या निर्धार
प्रकृती गंभीर असतानाही मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार कायम ठेवला आहे. त्यांच्या नियोजित मार्गात पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर आणि खोपोली असे टप्पे आहेत. मात्र, प्रत्यक्ष प्रवास त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून राहणार आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी आझाद मैदानातील उपोषणाला परवानगी नाकारली आहे. तरीही मुंबईकडे जाण्याचा निर्णय बदललेला नसल्याचे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
