जेएनएन, बीड/मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मुंबईकडे सुरू असलेल्या प्रवासादरम्यान प्रकृती आणि पुढील दौऱ्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. उपोषणामुळे प्रकृतीवर परिणाम होत असल्याने खोपोलीपर्यंतचा पुढील दौरा करणे शक्य होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून दौरा त्यापेक्षा महत्त्वाचा नाही, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे रात्री दोन वाजता झालेल्या सभेत जरांगे पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारवरही टीका केली. “सलाईन घेतले की सरकार बिनधास्त होतं. सलाईन सोडली की मात्र टेन्शनमध्ये येतं,” असे ते म्हणाले. 

उपोषणाच्या काळात एवढा मोठा प्रवास करणे शरीरासाठी त्रासदायक ठरत असल्याचे जरांगे यांनी सांगितले. “उपोषणात दौरा चांगला नाही. त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो. आरक्षण महत्त्वाचे आहे, दौरा महत्त्वाचा नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. 

‘खोपोलीपर्यंत जायचे म्हणजे जेवण खाल्लेले असले पाहिजे’ 

मुंबईच्या दिशेने सुरू असलेल्या प्रवासाबाबत बोलताना जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची परिस्थितीही कार्यकर्त्यांसमोर मांडली. “खोपोलीपर्यंत जायचे म्हणजे माणूस जेवण खाऊन असला पाहिजे. मला पुढचा दौरा आता शक्य होत नाही,” असे ते म्हणाले. 

दरम्यान, पुढील प्रवासाबाबत त्यांनी पर्यायी मार्गही सांगितला. “मी पाटोद्यातून पोलिसांना सांगून मुंबईला जाईल,” असे जरांगे पाटील यांनी म्हटले. 

    ‘ज्याला कोणी वस्ताद नाही, त्याचा बाप आहे मी’

    सभेत जरांगे यांनी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगताना आक्रमक भाष्य केले. “ज्याला कोणी वस्ताद नाही, ज्याला कोणी बाप नाही, त्याचा बाप आहे मी. चांगल्या चांगल्याची जिरवली आहे,” असे ते म्हणाले. 

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रकृतीकडेही लक्ष लागले आहे. त्याचवेळी मुंबईकडे निघालेल्या त्यांच्या समर्थकांच्या प्रवासाचे पुढील नियोजन काय असेल, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

    पाटोदा येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरून प्रकृती अस्वस्थ असल्यास नियोजित दौरा थांबवण्याची किंवा त्यात बदल करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, मुंबईत पोहोचून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे नेण्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.