जेएनएन, लातूर: राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून, त्याआधीच लातूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 38 अपक्ष उमेदवार शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे लातूरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून, भाजप आणि काँग्रेससाठी ही बाब मोठा धक्का मानली जात आहे.
शिंदेंचा लातूरमध्ये मास्टरस्ट्रोक
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लातूरमध्ये थेट मैदानात उतरत अपक्ष उमेदवारांची मोठी मोट बांधण्याची रणनीती आखली आहे. महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवार प्रभावी स्थितीत असतात. याच बाबीचा अचूक अंदाज घेत शिंदे गटाने त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची खेळी केली आहे. लवकरच लातूरमध्ये भव्य प्रवेश कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, एकनाथ शिंदे आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.
भाजप-काँग्रेसची डोकेदुखी वाढणार!
लातूरमध्ये आतापर्यंत मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात रंगणार असल्याचे चित्र होते. मात्र, मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार शिवसेना (शिंदे गट) मध्ये दाखल झाल्यास निवडणुकीचे गणित पूर्णपणे बदलू शकते. अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांचा प्रभाव असल्याने, त्यांचा पाठिंबा मिळाल्यास शिंदे गट थेट सत्तासमीकरणात निर्णायक भूमिका बजावू शकतो.
स्थानिक नेत्यांचा सक्रिय सहभाग संपूर्ण हालचालींमागे शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून जोरदार तयारी केली होती. अपक्ष उमेदवारांशी स्वतंत्र बैठका, प्रभागनिहाय समीकरणांचा अभ्यास, तसेच संभाव्य नगरसेवकांशी थेट संवाद साधत शिंदे गटाने स्थानिक पातळीवरील आपली पकड अधिक मजबूत केली आहे.
15 जानेवारीपूर्वी आणखी धक्कादायक घडामोडी?
या प्रवेशामुळे केवळ लातूरच नव्हे तर मराठवाड्यातील इतर महापालिकांमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. 15 जानेवारीच्या मतदानापूर्वी आणखी काही मोठे पक्षप्रवेश आणि युतीचे संकेत मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
