जेएनएन, लातूर, Marathwada Rain Update: मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे  संकट निर्माण झाले आहे. लातूरसह बीड, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यांतील बहुतांश भागात गेल्या 28 दिवसांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

लातूर जिल्ह्यातील भीषण परिस्थिती!

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी केवळ 101.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे, मागील वर्षीच्या तुलनेत 188 मिमीने कमी पाऊस पडला आहे. जिल्ह्यात साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली असून, बियाणेवर शेतकऱ्यांनी मोठा आर्थिक खर्च केला आहे. मात्र पावसाअभावी पिके  आता सुकू लागली आहे. पुढील आठ दिवसात पाऊस न पडल्याने दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. 

दुबार पेरणीचा खर्च आणि धोका!

सोयाबीनच्या एका एकर पेरणीसाठी शेतकऱ्यांना सुमारे 10 ते 12 हजार रुपयांचा खर्च येतो. जर दुबार पेरणी करावी लागली, तर हा खर्च पुन्हा करावा लागणार आहे. शेतकऱ्यांसाठी हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. 

कीड आणि ढगाळ हवामानामुळे संकटात भर!

    ढगाळ वातावरण आणि उष्णता यामुळे किडींचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनक्षमतेवर होणार आहे. विशेष म्हणजे सोयाबीनच्या फुलधारणच्या  कालावधीत पाऊस न झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    बीडमध्ये थोडासा दिलासा!

    बीड जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या दमदार पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. जून महिन्यात केवळ 59% पावसाची नोंद झाली असून जुलैमध्येही पाऊस समाधानकारक नाही.

    जालन्यातही दुबार पेरणीचे संकट

    जालन्यातही काही भागात काल जोरदार पाऊस झाला आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. येत्या सात आठ दिवसांत पावसाने हजेरी लावली नाही तर शेतकऱ्यांवर दुपार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. काल काही भागात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. 

    शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम!

    बळीराजा आजही ढगांकडे डोळे लावून बसला आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवली असली, तरी प्रत्यक्षात पाऊस कधी आणि किती पडेल, यावरच खरीप हंगामाचं भवितव्य ठरणार आहे.